
इंग्लंडने चौथ्या अॅशेस (Ashes) कसोटी सामन्यातील फलंदाजीचा क्रम बदलला आहे. सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) याच्या जागी जो डेन्ली आता ओल्ड ट्रॅफर्ड येथे डावाची सुरुवात करणार. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेचा चौथा सामना 4 सप्टेंबरपासून खेळला जाईल. मालिकेचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर तर दुसरा सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडने लीड्समधील तिसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. चौथा कसोटी सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण फ्लॉप ठरला आहे. विश्वचषकात शानदार कामगिरीनंतर कसोटी संघात स्थान मिळविलेल्या रॉयने पहिल्या तीन सामन्यांच्या 6 डावात फक्त 57 धावा केल्या होत्या. त्यामुळे, रॉयला मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Ashes 2019: चौथ्या टेस्टसाठी मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांचे पुनरागमन, उस्मान ख्वाजा आऊट)
शिवाय, वेगवान गोलंदाज क्रेग ओवर्टन चौथ्या अॅशेस टेस्टसाठी क्रिस वोक्स याच्या जागा घेण्याची पुष्टी कर्णधार जो रूट याने केली आहे. लीड्समध्ये विजय मिळवलेल्या इंग्लंड संघात फक्त एकच बदल करण्यात आला आहे. लीड्स येथील तिसरा सामना इंग्लंडने 1 विकेटने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड 2017-18 च्या अॅशेस दौर्यादरम्यान ओवर्टनने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. ओवर्टनने पहिल्याच सामन्यात स्टिव्ह स्मिथ यांची विकेट मिळवली होती.
इंग्लंड संघ: जो रूट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुर्रान, जो डेन्ली, जॅक लीच, क्रेग ओवर्टन, जेसन रॉय, बेन स्टोक्स (उपकर्णधार), क्रिस वोक्स.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने देखील संघात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. माजी कर्णधार आणि तुफान फलंदाजी करत असणारा स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) संघात परतला आहे. तर, मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याला देखील 12 सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. दरम्यान, उस्मान ख्वाजा याला बाहेर करण्यात आले आहेत. यंदाच्या अॅशेस मालिकेत ख्वाजा काही दमदार खेळी करू शकला नाही. ख्वाजाने मागील तीन सामन्यांच्या 6 डावात 20.33 च्या सरासरीने केवळ 122 धावा केल्या आहेत.