बीसीसीआयच्या (BCCI) विद्यमान अध्यक्षावरून टीएमसी (TMC) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यानंतर आता सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी क्रिकेटपटूवर हा घोर अन्याय असल्याचे म्हटले आहे. उत्तर बंगालच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर निघताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, ‘मी सर्व देशवासीय आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या वतीने सांगेन की सौरव हा आमचा अभिमान आहे. सौरवने मैदानावर कुशलतेने खेळ खेळले तसेच प्रशासनही कुशलतेने हाताळले.’
आता ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मी भारत सरकारला विनंती करते की त्यांनी याबाबत राजकीयदृष्टीने निर्णय घेऊ नये, खेळाला खेळासारखे राहू द्या. सौरव हा क्रीडा जगतातील प्रतिभावंत आहे. तो राजकीय पक्षाचा सदस्य नाही. त्यामुळे सौरवच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्या आणि त्याला आयसीसी निवडणूक लढवण्याची संधी द्या.’
त्या पुढे म्हणाल्या की, ‘सौरवला बीसीसीआयमधून काढून टाकल्यानंतर ही उणीव भरून काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सौरवला आयसीसीची निवडणूक लढवू देणे. जगमोहन दालमिया, शरद पवार आयसीसीमध्ये गेले होते. सौरव आयसीसीचा प्रतिनिधीही होता. मी पंतप्रधानांना विनंती करते की, कृपया सौरवला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी.’ (हेही वाचा: ICC चा मोठा निर्णय, T20 World Cup मध्ये कोरोनाबाधित खेळाडूच्या खेळावर बंदी नाही)
याप्रकरणी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांना सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढवायचा असेल तर त्यांनी त्यांना पश्चिम बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवायला हवे होते. खेळाचे राजकारण करू नका. पंतप्रधान मोदी या गोष्टींपासून दूर राहतात. ममता दीदींना दादांचे इतके भले व्हावे असे वाटत असेल तर, त्यांनी शाहरुख खानला हटवून सौरव गांगुलीला पश्चिम बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवावे.