Women's T20 WC 2023 Semifinal: उपांत्य फेरीतील सर्व संघ निश्चित, भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान; टीम इंडियाच्या खेळाडूंना करावी लागणार आश्चर्यकारक कामगिरी
Women's Team India (Photo Credit - Twitter)

महिला टी-20 विश्वचषक 2023 (Women's T20 World Cup 2023) ची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या गटातील सामन्यात बांगलादेशचा 10 गडी (SA vs BAN) राखून पराभव केला. यासह उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत. जगातील अव्वल 5 पैकी ४ संघांमध्ये उपांत्य फेरी खेळली जाईल. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने केपटाऊन येथील न्यूलँड्स येथे होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 23 फेब्रुवारीला पहिला उपांत्य सामना होणार आहे. त्याच वेळी, दुसरा उपांत्य सामना 24 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीतील सर्व संघांबद्दल जाणून घेऊया. (हे देखील वाचा: Smriti Mandhana ची तुफानी खेळी, टी-20 क्रिकेटमध्ये केला 'हा' मोठा करिष्मा)

1. भारत

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2020 च्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने एकूण पाचव्यांदा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी ग्रुप स्टेजमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. भारताने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडविरुद्ध 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. टी-20 वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत ऋचा घोष, शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी टीम इंडियासाठी शानदार खेळी खेळल्या आहेत. त्याचबरोबर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी गोलंदाजीत कमाल केली आहे. या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत आपले कौशल्य दाखवावे लागणार आहे.

2. ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियन संघाने सर्वाधिक 5 वेळा महिला टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. यावेळीही ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो सलग तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकेल. सध्या ऑस्ट्रेलियन संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांनी गटातील सर्व सामने जिंकले आणि गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. त्यांच्याकडे अॅलिसा पॅरी, बेन मुनी आणि मॅग लॅनिंगसारखे खेळाडू आहेत.

3. दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या गटातील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यानंतर संघाने शानदार पुनरागमन करत उपांत्य फेरीत धडक मारली. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या गटातील सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शबनीम इस्माईल, मारिझान कॅप आणि अयाबोंगा खाका हे वेगवान त्रिकूट उपांत्य फेरीत इंग्लंडसाठी मोठा धोका ठरू शकतो.

4. इंग्लंड

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने 2009 मध्ये पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर या संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी इंग्लंड संघाने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहेत. इंग्लंडचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्ध महिला टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम धावसंख्या केली.