Ajinkya Rahane Birthday: 2020-21 मध्ये भारतीय संघ (Indian Team) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला गेला होता. पण या दौऱ्यावर भारतीय संघाला पहिल्याच कसोटी सामन्यात असे काही पाहायला मिळाले की, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. असे झाले की या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट झाली. कसोटी क्रिकेटमध्ये एखादा संघ इतक्या कमी धावसंख्येवर बाद होण्याचीही पहिलीच वेळ ठरली. यानंतर कोहली आपल्या मुलीच्या जन्मासाठी दौऱ्यावरून मायदेशी रवाना झाला. आता भारतीय संघाची कमान अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) हाती होती. यादरम्यान रहाणेने आपल्या नेतृत्वात असा इतिहास रचला जो क्वचितच कोणी विसरू शकेल. रहाणे आज 6 जून रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत आज आपण त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची जाणीव करून घेऊया. (Indian Racism Row: पंचांनी टीम इंडियाला खेळ सोडण्याचा दिला सल्ला, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाच्या घटनेमागची रहाणेने सांगितली कहाणी)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ मेलबर्नला पोहोचला तेव्हा यावेळी संघाची कमान अजिंक्य रहाणेकडे होती. आता या सामन्यातील पहिल्या पराभवाचा बदला संघाला घ्यायचा होता आणि संघाचे कर्णधारपद रहाणेच्या खांद्यावर होते. या सामन्यात रहाणेने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना 112 धावा केल्या आणि कांगारू संघाच्या गोलंदाजांना तंबी दिली. रहाणेच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करत आपण कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिले. आता या विजयासह भारताने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. यानंतर सिडनी येथे कसोटी सामना झाला, जो भारताने अप्रतिम फलंदाजी करताना अनिर्णित राखला आणि शेवटचा सामना गब्बा येथे झाला जिथे भारताने ऋषभ पंतच्या जोरावर विजय मिळवला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 32 वर्षांनंतर प्रथमच गाबा येथे कसोटी सामना गमावला.
विश्वासू फलंदाज, जो आता करतोय संघर्ष
अजिंक्य रहाणेला टीम इंडियाचा भाग होऊन जवळपास एक दशक झाले आहेत. या काळात तो सुरुवातीला अनेकदा संघर्ष करताना दिसला. परंतु प्रत्येक वेळी त्याने परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा कणा असल्याचे सिद्ध केले. पण अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहे. आणि परिस्थिती अशी आहे की त्याचे कसोटी संघातील स्थानही धोक्यात आले आहे. खराब फॉर्ममुळे त्याला श्रीलंका मालिकेतून वगळण्यात आले, तर आता तो इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातूनही त्याला बाहेर करण्यात आले आहे. तसेच आयपीएल 2022 च्या शेवटी त्याला दुखापत झाली ज्यामुळे आता त्याला काही महिने बाहेर बसावे लागणार आहे.
असा आहे अजिंक्य रहाणेचा विक्रम
• 82 कसोटी सामने, 38.52 च्या सरासरीने 4931 धावा
• 90 एकदिवसीय सामने, 2962 धावा, 35.26 सरासरीने
• 20 T20 सामने, 375 धावा, 20.83 च्या सरासरीने