ICC कडून श्रीलंकेच्या 3 खेळाडूंची मॅच-फिक्सिंग प्रकरणी चौकशी, माजी क्रिकेटपटूंचा समावेश असल्याची क्रीडा मंत्रांनी दिली माहिती
(Image Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आपल्या देशातील किमान तीन क्रिकेटपटूंच्या मॅच फिक्सिंगची (Match Fixing) चौकशी करत आहेत, असे श्रीलंकेचे (Sri Lanka) क्रीडामंत्री दुलास अलाहापेरुमा यांनी बुधवारी सांगितले. ते म्हणाले, "खेळात शिस्त व चारित्र्य घसरल्याचे आम्हाला वाईट वाटते." श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) म्हटले आहे की सध्याचा कोणताही खेळाडू आयसीसीच्या तपासणीत सामील नाही. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज उमर अकमलवर पाकिस्तान बोर्डाने मॅच फिक्सिंगप्रकरणी तीन वर्षांची बंदी घातली. आणि हे प्रकरण शांत होईपर्यंत श्रीलंकेच्या तीन खेळाडूंचे नाव मॅच फिक्सिंग प्रकरणात जोडले गेले आहे. या खेळाडूंची नावं मात्र आयसीसी किंवा श्रीलंका बोर्डाने स्पष्ट केली नाहीत. क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ (gentleman’s game) आहे. पण अशा खेळामध्ये पैशापुढे शिस्त व चारित्र्य कमी पडल्याचे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत आहे, असे अलाहापेरुमा म्हणाले. (पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलवर 3 वर्षांसाठी बंदी- पीसीबी)

“माननीय मंत्री महोदयांनी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटद्वारा सुरू केलेल्या तपासाविषयी जो उल्लेख केला, त्यातील तीन खेळाडू हे माजी क्रिकेटपटू आहेत. श्रीलंकेच्या विद्यमान संघातील नाहीत असा आम्हाला विश्वास आहे”, असे मंडळाच्या निवेदनात म्हटले आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी वेगवान गोलंदाज शेहान मधुशंकाला यापूर्वी श्रीलंका बोर्डानेनिलंबित केले होते. या प्रकरणाबद्दल अलाहापेरुमा म्हणाले, “ही बाब खूपच खेदजनक आहे. चाहत्यांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने अपेक्षाभंग केला.”

श्रीलंका क्रिकेट संघ हा एकेकाळी क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट संघ आहे. संघाला खेळाडूंच्या खराब फॉर्मचा सामना करावा लागत असताना टीमच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, श्रीलंकामध्ये मॅच-फिक्सिंगला गुन्हा घोषित करण्यात आला आहे.मॅच फिक्सिंगमध्ये  दोषी आढळल्यास खेळाडूला गुन्हेगारीच्या प्रकारात दहा वर्षांची शिक्षा व जास्त दंड ठोठावण्यात येईल.