सौरव आणि सना गांगुली (Photo Credits: Twitter)

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (Citizenship Amendment Act) जामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी मारहाण केल्याची घटना, देशभरात जंगलातील आगीसारखी पसरली आहे. जवळजवळ सर्व लोक या गोष्टीचा निषेध करत आहेत. यादरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची मुलगी सना गांगुलीची (Sana Ganguly) एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये सना नागरिकत्व विधेयकाला विरोध करण्याऱ्या जनेतला पाठींबा देतेना दिसून येत आहे. अवघ्या काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली होती. बऱ्याच लोकांनी सनाच्या विचारांचे कौतुक केले होते. मात्र आता सौरव गांगुली यांनी ही पोस्ट खरी नसल्याचे सांगितले आहे.

सौरव गांगुली ट्विट -

सौरव गांगुली यांनी आपली मुलगी सनाच्या पोस्टबाबत ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘कृपया सनाला या सर्व बाबींपासून दूर ठेवा .. ही पोस्ट खरी नाही .. राजकारणातील अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी अजूनही सना ही खूप लहान मुलगी आहे.’ या ट्विटनन्तर पुन्हा नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सौरव गांगुली यांनी आपल्या कन्येला पाठींबा द्यायला हवा असे म्हटले आहे. तर काही लोकंनी सौरव यांना ट्रोल करत ‘अमित शहांना घाबरू नका, मुलींचा अभिमान बाळगा’ असा खोचक सल्लाही दिला आहे. (हेही वाचा: CAA Protest: सौरव गांगुली याची मुलगी सना हिने विरोधकांना दिला पाठिंबा?)

सना गांगुलीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट - 

दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये सनाने लेखक खुशवंतसिंग यांच्या पुस्तकाच्या उताराद्वारे, देशातील सद्य परिस्थितीवर निशाणा साधत आपला विरोध दर्शविला आहे. मात्र, आता ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर त्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. मात्र आता सौरव गांगुलीने लोकांना सनाला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.