नवी दिल्ली: एशिया कप २०१८ साठी आज (बुधवार, १९ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता सर्वात मोठा सामना रंगणार आहे. ज्याच्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरीक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पीयन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्या भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात भारत गेल्या पराभवाचे उट्टे काढणार की, आपली विजयी कामगिरी पाकिस्तान कायम ठेवणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. संयुक्त अरब अमीरातमध्ये झालेल्या सामन्यानंतर उभय देशांमध्ये पहिल्यांदाच सामना रंगत आहे.
प्रदीर्घ काळानंतर दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. मात्र, एशिया चषकातील दोन्ही संघाच्या एकूण कामगिरीवर नजर टाकली असता पाकिस्तानचे पारडे काही अंशी जड असल्याचे दिसते. १९८४पासून सुरु झालेल्या एशियाई कप टूर्नामेंटच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण १२ वेळा एकमेकांशी भिडलेआहेत. ज्यात भारताने ५ तर, पाकिस्तानने एकूण ६ सामने जिंकले आहेत. त्यामुळे तसे पाहता दोन्ही संघ एकमेकांना तुल्यबळ असेच आहेत.
एशिया कपसाठी पहिली टूर्नामेंट १९८४मध्ये संयुक्त अरब अमीरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान आदींनी सहभाग घेतला होता. भारताने पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध १० गडी राखून जिंकला होता. अंतिम सामन्यासाठी भारताचा मुकाबला पाकिस्तानसोबत झाला होता. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत १८८ धावा केल्या. उत्तरादाखल मैदनात उतरलेल्या पाकिस्तानचा संघ अवघ्या १३४ धावांमध्येच गारद झाला. या विजायमुळे भारताने पहिल्याच एशियाई चषकावर आपले नाव कोरले.