अमेरिका पहिल्यांदाच खेळणार आंतरराष्ट्रीय T20; 14 खेळाडूंचा संघ जाहीर
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये क्रिकेट लोकप्रिय असला तरी, अमेरिकेमध्ये क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणारी मंडळी फार कमी आहेत. मात्र आता जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिके (USA Cricket) ने गुरुवारी 14 सदस्यीय टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ (T20 International Series Squad) जाहीर केला आहे. अमेरिका संयुक्त अरब अमीरातविरुद्ध आपली पहिली टी -20 मालिका खेळणार आहे, ही मालिका 15 मार्च पासून सुरू होणार आहे. दुबई (Dubai)मध्ये ही मालिका पार पडणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ लवकरच दुबईला रवाना होतील. या मालिकेद्वारे आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग डिव्हिजन 2 ची तयारी सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या संघाला एक चांगली संधी मिळणार आहे. एप्रिल महिन्यात नामिबिया येथे आयसीसीच्या दुसऱ्या स्तरावर होणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अमेरिका संघ तयारी करत आहे.

महत्वाचे म्हणजे टी -20 अमेरिकन संघाचे नेतृत्व मूळ भारतीय असलेला सौरभ नेत्रवलकर (Saurabh Netravalkar) करत आहे, तर स्पर्धेच्या तयारीसाठी 37 वर्षाचा झेव्हिअर मार्शल (Xavier Marshall) या फलंदाजाचे अमेरिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्याने विंडीजकडून 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय, जसदीप सिंग (Jasdeep Singh) यालादेखील अमेरिकन संघात स्थान मिळाले आहे. पूर्वी, ओमानमधील डिव्हिजन 3 सामन्यामधून त्याला वगळण्यात आले होते. हा पहिला टी20 सामना 15 मार्च रोजी आयसीसीच्या अकादमी ओव्हल अकादमी येथे खेळला जाईल.

दुसरा सामना त्याच टिकाणी दुसऱ्या दिवशी खेळला जाईल. त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या एक-दिवसीय मालिकाचे शेड्यूल नंतर ठरवले जाईल. अमेरिकेच्या या संघात भारतीय मूळ असलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिका संघ

सौरभ नेत्रवलकर (कर्णधार), एल्मोरे हचिन्सन, अॅरोन जोन्स, नोस्तुश केन्जीगे, मुहम्मद अली खान, जान निसार खान, जस्करन मल्होत्रा, झेव्हिअर मार्शल, मोनंक पटेल, तिमिल पटेल, रॉय सिल्वा, जसदीप सिंग, स्टीव्ह टेलर आणि हेडन वॉल्श ज्यूनिअर