थायलंडमध्ये (Thailand) हत्येचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका लग्नात वराने वधूसह 4 जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. नंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. या घटनेने उपस्थित प्रत्येकजण हादरून गेला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या वराने आपल्याच लग्नाच्या पार्टीत पिस्तुलाने वधूसह चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी उत्तर-पूर्व थाई प्रांतातील नाखोन रत्चासिमा येथील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात ही दुःखद घटना घडली.

बँकॉक पोस्टच्या म्हणण्यानुसार, 29 वर्षीय माजी सैनिक आणि पॅरालिम्पिक ऍथलीट चतुरॉंग सुकसुक (Chaturong Suksuk), 44 वर्षीय कांचना पचुन्थुक नावाच्या महिलेसोबत तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. शनिवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. यानंतर रिसेप्शन पार्टी देण्यात आली. मात्र, लग्नाच्या जल्लोषात वर सुकसुक अचानक पार्टीतून बाहेर पडला आणि पिस्तुल घेऊन परतला. त्याने लग्नात काही वैयक्तिक बाबींवरून वाद घातला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने गोळीबार केला. या हल्ल्यात वधु, वधूची 62 वर्षीय आई आणि 38 वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला. त्याने दोन पाहुण्यांवरही गोळ्या झाडल्या, ज्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. यानंतर वराने स्वत:वर गोळी झाडली व त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या ठिकाणाहून 9 मिमीच्या दारूगोळ्याची अकरा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून पुरावे गोळा करत आहेत. (हेही वाचा: Israel Lists Lashkar -e- Taiba as a Terror Organization: Mumbai Terror Attacks च्या 15 व्या स्मृतिदिना निमित्ताने Embassy of Israel in India ने दिली महत्त्वाची अपडेट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)