IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League_ 15 वे पर्व स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी निराशाजनक ठरले आहे. पाच वेळा आयपीएलचा किताब काबीज केलेली रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबईने आतापर्यंत खेळलेले सर्व सात सामन्यात पराभवाची धूळ खाल्ली आहे. यामुळे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परिणामी संघाच्या लिलावाच्या धोरणावर सवाल उठवला जात आहे. मेगा लिलावात खराब खेळाडूंची निवड हे मुंबईच्या अपयशामागचे सर्वात मोठे कारण ठरत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी मुंबईनेही आपल्या संघातून काही खेळाडूंना बाहेर केले ज्यांनी या संघाला चॅम्पियन बनवले आहे. मुंबईने भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केले. मुंबईने या जोडीवर 23 कोटींहून अधिक खर्च केले, जे मेगा लिलावात त्यांच्या संपूर्ण बजेटपैकी निम्मे आहे. अशा परिस्थितीत आज आपण अशा तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांच्याकडे लिलावात दुर्लक्ष करणे मुंबईला चांगलेच महागात पडले. (IPL 2022: दिग्गज खेळांडूंपेक्षाही सरस कामगिरी पाहता, ‘या’ पाच खेळाडूंना गमावल्याचा फ्रँचायझींना होत असेल पश्चाताप)
1. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)
मेगा लिलावात मुंबईने त्यांच्या सर्वात घातक फलंदाजांपैकी एक डी कॉकला बाहेर केले. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डी कॉक गेल्या वर्षीपर्यंत कर्णधार रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्सचा घातक सलामीवीर होता. डी कॉकने मुंबईसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते. मात्र यंदाच्या मेगा लिलावात मुंबईने त्याला डच्चू दिला आणि आता किशन रोहितसोबत मुंबईसाठी ओपनिंग करत असून ही जोडी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. डी कॉक आता केएल राहुलसोबत लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीला धमाकेदार कामगिरी करत आहे.
2. राहुल चहर (Rahul Chahar)
या यादीत दुसरे नाव स्टार फिरकी गोलंदाज राहुल चहरचे आहे. चहरने मुंबईसाठी नेहमीच चांगली कामगिरी केली, पण संघाने त्याला अशा प्रकारे लिलावात पंजाबकिंग्स च्या दिशेने जाण्याची परवानगी दिली. चहर आता पंजाबसाठी प्रभावी कामगिरी करत असून मुंबईच्या संघाला एका अनुभवी आणि चांगल्या फिरकी गोलंदाजाची कमतरता जाणवत आहे.
3. ट्रेंट बोल्ट (Trent Boult)
न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज बोल्टची मुंबईला इतर खेळाडूंपेक्षा जास्त उणीव भासत आहे. खुद्द जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज एकट्या मुंबईसाठी एकही सामना जिंकू शकलेला नाही. बुमराह विकेट्ससाठी संघात करत आहेत, तर अन्य विदेशी गोलंदाज नियमितपणे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत आहे. गेल्या मोसमापर्यंत बोल्ट आणि बुमराहने जगभरातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवले केले होते. राजस्थान रॉयल्स संघाच्या या हंगामातील जबरदस्त कामगिरी मागील एक कारण बोल्ट देखील आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)