इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चे सामने सध्या महाराष्ट्राच्या मुंबई आणि पुणे येथे खेळले जात आहेत. प्रत्येक संघात विजय मिळवण्यासाठी काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. काही संघ चांगली कामगिरी करत आहेत तर काही अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. दरम्यान खेळाडूंचे मूल्यांकनही सुरू झाले आहे. काही खेळाडू उत्कृष्ट खेळ दाखवत आहेत तर काही खूप वाईट पद्धतीने फ्लॉप ठरत आहेत. आता फ्रँचायझींना देखील मेगा लिलावापूर्वी ज्या खेळाडूंना सोडले होते त्यांची उणीव भासत असल्याचं दिसत आहे, कारण आता तेच खेळाडू इतर संघात जाऊन चमकदार खेळ करत आहेत. आज त्या 5 खेळाडूंबद्दल बोलूया, ज्यांना रिलीज करून कदाचित फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल. (IPL 2022: आयपीएल संघासाठी महागडे खेळाडू ‘पांढरा हत्ती’; किंमत मोठी, कामगिरी शुन्य, संघमालकांसह चाहत्यांनाही साजेशा खेळीची प्रतिक्षा)
1. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
चहल गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) कडून खेळत होता. विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले आणि आरसीबीनेही चहलला लिलावापूर्वी बाहेर केले. RCB ने चहलला रिलीज करण्याची शक्यता कमी होती, पण त्यांना चाहत्यांना मोठा धक्का दिला. यानंतर मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) युजी चहलला आपल्या ताफ्यात घेतले. सध्या त्याने पर्पल कॅप काबीज केली असून आतापर्यंत 6 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत चहलला सोडल्याचा पश्चात्ताप आरसीबी संघाने केला असण्याची शक्यता आहे.
2. कुलदीप यादव (Kuldeep Yadav)
दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) पर्पल कॅपच्या शर्यतीत चहलला टक्कर देणारा कुलदीप यादव याआधी केकेआरसोबत होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कमीच संधी मिळाली. गेल्या वर्षी कुलदीपला फक्त मोजक्याच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. परिणामी मेगा लिलावापूर्वी केकेआरने त्याला रिलीज केले आणि लिलावाच्या मैदानात दिल्लीने त्याला खरेदी केले. आयपीएलमध्ये कुलदीपने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आणि चहलनंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने या वर्षात आतापर्यंत सहा सामन्यांत 13 बळी घेतले आहेत.
3. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर होता आणि सातत्याने चांगली कामगिरी करत होता. पण मेगा लिलावापूर्वी जेव्हा CSK ने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली तेव्हा त्यात डु प्लेसिसचे नाव नव्हते. जणू इथून आरसीबीने कोणत्याही परिस्थितीत डु प्लेसिसला खरेदी करण्याचे आणि कर्णधारही बनवायचे ठरवले. आरसीबीने डु प्लेसिसला चांगल्या किमतीत टीममध्ये सामील केले आणि त्याला कर्णधार बनवलं. यानंतर आरसीबी यंदा चांगली कामगिरी करत असून सीएसके संघ अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सीएसकेला फाफ डु प्लेसिसची उणीव भासत असेल.
4. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
आयपीएल 2020 अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणारा श्रेयस पहिला कर्णधार होता. मात्र त्यानंतर तो दुखापतीमुळे काही सामन्यांपासून बाहेर पडला आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. अय्यर बरा झाल्यावरही पंत कर्णधार बनून राहिला. यानंतर, आयपीएल 2022 पूर्वी दिल्लीने श्रेयसला रिलीज केले आणि केकेआरने त्याला आपल्या संघात सामील केले. इतकंच नाही तर त्याला कर्णधारही बनवले. आणि आता या वर्षी केकेआर देखील अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत सातपैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सहा गुण आहेत. सध्या संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
5. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण करणारा हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स, या नवीन फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. हार्दिक पांड्या सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. तसेच गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असताना, मुंबई इंडियन्सचा संघ सध्या दहाव्या क्रमांकावर संघर्ष करत आहे.