उत्तर प्रदेशातून आरोग्य विभागाला लाजवेल अशी एक संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एका मुलाने न घाबरता मगरीशी झुंज देत अतुलनीय शौर्य दाखवले. काही मिनिटे तो मगरीच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत राहिला. या झटापटीत त्याला आपला एक हात गमवावा लागला. त्यानंतर बालकाला उपचारासाठी निघासन सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. या ठिकाणी त्याच्यावर चक्क बसण्यासाठी असलेल्या बेंचवर उपचार करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये दिसत आहे की मुलगा बेंचवर झोपला असून, त्याला तिथेच सलाईन चढवले जात आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.

माहितीनुसार, 11 वर्षीय मुलगा संकित कुमार शुक्रवारी (28 जून) आपल्या आईसोबत गवत गोळा करण्यासाठी गावाबाहेर गेला होता. संकित तलावाजवळ पोहोचताच पाण्यात लपलेल्या एका मोठ्या मगरीने त्याला पकडले. हे पाहून संकितच्या आईला धक्काच बसला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. तिने मगरीला काठीने मारहाण करण्याचाही प्रयत्न केला, मात्र मगरीने संकितला तलावात ओढणे सुरूच ठेवले. संकित मात्र सर्व शक्तीनिशी मगरीशी लढत राहिला. त्यानंतर आईचा आरडाओरडा ऐकून काही लोक तेथे आले आणि त्यांनी कसे तरी मगरीच्या जबड्यातून संकेतची सुटका केली. तोपर्यंत मगरीने संकितचा डावा हात चावला होता. (हेही वाचा: बुलंदशहरमध्ये 6 यूट्यूबर्सनी रील बनवण्यासाठी रिक्रिएट केला शाहरुख खानचा 'जवान' लूक; पोलिसांकडून अटक)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)