Agastya Chauhan (Photo Credits: Twitter)

यूट्यूबर अगस्त्य चौहान (YouTuber Agastya Chauhan) याचा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे झालेल्या अपघातात दुःखद मृत्यू झाला आहे. अगस्त्य 300 किमी/.प्रति तास वेगाने दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करत असताना त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली व उलटली. यूट्यूबर अगस्त्य काल त्याच्या रेसिंग बाइकवरून आग्राहून दिल्लीला जात होता. यावेळी  त्याची दुचाकी अनियंत्रित झाली व त्यामुळे एक भीषण अपघात घडला. त्याचे हेल्मेटसुद्धा त्याचा जीव वाचवू शकले नाही. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

25 वर्षीय मृत अगस्त्य चौहान हा डेहराडूनमधील कॅनॉट पॅलेसचा रहिवासी होता. आग्रा ते नोएडा या दरम्यानच्या 47 किलोमीटरच्या यमुना एक्सप्रेसवेवर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिगढमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. अगस्त्य चौहान याचे युट्यूबवर PRO RIDER 1000 नावाचे चॅनल आहे, ज्याचे लाखो दर्शक आणि लाखो सदस्य आहेत. यूट्यूबर अगस्त्य चौहान बाईक चालवतानाचा प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असे. सांगितले जात आहे की अगस्त्यने त्याची रेसिंग बाइक ताशी 300 किलोमीटर वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो बाईक चालवताना व्हिडिओही बनवत होता.

अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर पहिल्यांदा 300 च्या वेगाने रेसिंग बाइक चालवली तेव्हा त्याला ती हाताळता आली नाही. यादरम्यान डिव्हायडरला धडकल्याने अगस्त्य चौहान याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत आणखी काही साथीदारही दुसर्युं दुचाकीवर होते, त्यापैकी तीन साथीदार टोल प्लाझावरून दिल्लीच्या दिशेने परतले होते. (हेही वाचा: समस्तीपूरमध्ये स्कूटीवर सीटबेल्ट न घातल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी ठोठावला1000 रुपये दंड)

अलीगडचे डीआयजी आनंद कुलकर्णी यांनी सांगितले की, 3 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तपासात समोर आले की, घटनेच्या काही वेळापूर्वी आणखी एक व्हिडिओही बनवण्यात आला होता, ज्यामध्ये अगस्त्य ओव्हर स्पीड आणि 300 च्या स्पीडबद्दल बोलत होता. घटनास्थळी उपस्थित लोकांनीही अगस्त्य हे अतिशय वेगाने जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी अगस्त्यच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. पोस्टमॉर्टमनंतर कुटुंबीय मृतदेह डेहराडूनला घेऊन गेले.