Uttar Pradesh: थुंकला म्हणून टोकले.. तर त्या विकृताने शेजाऱ्याचे 11 कबूतर ठार मारले
Pigeons | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

माणसाच्या चांगूलपणाचा अथांगपणा जसा कळत नाही तशीच माणसाच्या विकृतपणाची खोलीही कळणे कठीण. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बागपत (Baghpat) येथेही अशीच घटना पुढे आली आहे. एका व्यक्तीने घरासमोर थुंकणाऱ्या (Spitting) तरुणाला टोकले. रस्त्यावर, उघड्यावर पचापच थुंकणे कधीही वाईटच. या सवीयवरुनच या युवकाला टोकले असता त्याने आपल्या विकृतीचे दर्शन घडवले. या तरुणास ज्या व्यक्तीने टोकले त्या व्यक्तीची 11 कबूतरं ठार मारली. हा तरुण आणि ती व्यक्ती दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. तरुणाच्या विकृतीमुळे निष्पाप कबूतरं जीवानिशी गेली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, धर्मपाल सिंह असे कबूतर मालकाचे नाव आहे. धर्मपाल सिंह यांनी राहुल सिंह याला घरासमोर थुंकतो म्हणून टोकले. आपल्याला थुंकताना टोकल्याचा राग मनात धरुन राहुल सिंह हा धर्मपाल सिंह यांच्या घरावर चढला आणि त्याने डोक्यात दगड घालून 11 कबुतरांना ठार मारले. धर्मपाल सिंह यांनी आपल्या 11 कबुतरांचा व्हिडिओ बनवला आणि राहुल सिंह याच्या विरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. धर्मपाल यांनी तक्रार दाखल केल्यापासून राहुल सिंह फरार आहे. (हेही वाचा, कल्याण: कबूतराच्या जीवाशी क्रूरतेने खेळणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल)

प्रसारमाध्यमांशी बोलताना धर्मपाल सिंह यांनी सांगितले की, राहुल सिंह वारंवार येऊन त्यांच्या घरासमोर येऊन थुंकत असे. मुळात उघड्यावर थुंकण्याची सवय ही वाईटच. त्यातही कोरोना व्हायरस संकटाच्या काळात थुंकणे आणखी वाईट. त्यामुळे राहुल सिंह याला आपण अनेकदा समज दिली होती. परंतू, तहीही तो आपली सवय बदलत नव्हता. थुंकण्याबाबत सातत्याने टोकत असल्याचे पाहून मनातून रागावलेल्या राहुल सिंह याने आपल्या कबुतरांना ठार मारले, असेही धर्मपाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

दरम्यन, बागपतचे सर्कल अधिकारी ओमपाल सिंह यांनी म्हटले आहे की, आम्ही वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये प्राथमिक तक्रार नोंदवली आहे. आम्ही लवकरच आरोपीला अटक करु.