Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नेहमी अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला दिला जातो. परंतु अनेकदा तरुण-तरुणी अशा वेबसाइट न तपासता इतर ऑफर्सना बळी पडतात. प्रत्येकवेळी अशा ऑफर्स खऱ्या असतीलच असे नाही, यामुळे तरुणांचे नुकसान होऊ शकते. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. हुबेहूब सरकारी अधिकृत अधिसूचनेसारखी दिसणारी एक नोकरीची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या नावाने जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेमध्ये, निवड प्रक्रियेद्वारे अर्जदारांना लिपिक पदासाठी भरती केली जाईल, असा दावा केला जात आहे. या पत्रात नोकरीची सुरुवातीची तारीख 15 नोव्हेंबर 2021 देण्यात आली आहे व त्यावरील पत्ता बेंगळुरूचा आहे. तुम्हालाही असे ऑफर लेटर मिळाले असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे ऑफर लेटर खोटे आणि बनावट आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिली आहे. हे व्हायरल नोटिफिकेशन समोर येताच त्याची तपासणी करण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या पीआयबी फॅक्ट चेक टीमला त्यांच्या तपासात ही नोटीस खोटी असल्याचे आढळून आले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, ‘रेल्वे मंत्रालयाच्या नावाने जारी केलेल्या ऑफर लेटरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अर्जदाराची लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे पत्र बनावट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वेतील नोकऱ्या फक्त रेल्वे मंत्रालयाने 21 RRB द्वारे घेतलेल्या परीक्षा पास झाल्यानंतर दिल्या जातात. अशा परिस्थितीत, हे ऑफर लेटर तुम्हाला फसवणुकीचा बळी बनवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे सतर्क रहा आणि तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.’ (हेही वाचा: Fact Check: प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना अंतर्गत मिळत आहेत 4000 रुपये? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

सरकारी फॅक्ट चेक एजन्सीने एका ट्विटमध्ये या संशयास्पद ऑफर लेटरचा स्क्रीनशॉट शेअर करून तरुणांना या फसवणुकीपासून सावध रहा असे सांगितले आहे.