Gallery Collapsed During a Football Match (PC - ANI)

Gallery Collapsed During a Football Match: केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात एका फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या बसण्यासाठी असलेली गॅलरी (Gallery) अचानक कोसळली. मलप्पुरम (Malappuram) जिल्ह्यात शनिवारी फुटबॉलचा सामना सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. तात्पुरती प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळल्याने दोनशेहून अधिक जण जखमी झाले. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा तात्पुरता स्टँड कोसळला, या घटनेत दोनशे लोक जखमी झाले, तर 5 जण गंभीर जखमी झाले. प्रेक्षक गॅलरी कोसळण्याची ही घटना पुंगोड स्टेडियमवर घडली. पुंगोड स्टेडियम मलप्पुरम येथे शनिवारी रात्री 9 वाजता सामना सुरू होत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरममध्ये शनिवारी रात्री झालेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या बसण्यासाठी बनवण्यात आलेली गॅलरी अचानक कोसळली आणि खाली पडली. ज्यामध्ये शेकडो प्रेक्षक अडकले आणि जखमी झाले. घटनेनंतर आयोजकांसह उपस्थिक प्रेक्षक घटनास्थळी पोहोचले. अनेक लोक घाबरून पळाले. (हेही वाचा - Baghpat Viral Video: तरुणाने फेकलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे रस्त्यावरच उलटली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल)

स्टेडियममध्ये सामन्यासंदर्भात तैनात असलेले पोलीस कर्मचारीही अपघातानंतर घटनास्थळाकडे जाताना दिसले. व्हिडिओमध्ये अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळताना दिसत असून त्यानंतर स्टेडियमवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, मलप्पुरम स्टेडियमवर फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या अपघातानंतर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांना मांजरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काही मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसण्यासाठी बनवलेल्या तात्पुरत्या गॅलरीत 1000 हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्यात प्रादेशिक फुटबॉल स्पर्धा खूप लोकप्रिय आहेत आणि त्यामुळे हजारो लोक हा सामना पाहण्यासाठी येत असतात.