सुरत: नवऱ्याचे बाबा आणि नवरीच्या आईचं सूत जुळलं; आईवडील पळून गेल्याने मुलांचं लग्न मोडलं, वाचा सविस्तर
Image For Representation (Photo Credits: File Image)

प्रेमात सर्व काही माफ असतं, असं म्हणतात, अगदी हाच विचार करून सुरत (Surat) मधील एका नवऱ्या मुलाचे बाबा आणि नवरी मुलीची आई या दोघांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या आधी पळ काढून स्वतःच लग्न केल्याचे समजत आहे. वाचून तुम्हीही चक्रावला असाल ना? तर झालं असं की, लहानपणापासून एकमेकांना ओळखणाऱ्या या युगुलाचे काही कारणास्तव एकमेकांशी लग्न होऊ शकले नव्हते. कालांतराने या दोघांच्या मुलांचे देखील प्रेमसंबंध जुळून आले, याच निमित्ताने या दोघांची सुद्धा पुन्हा ओळख झाली पण यावेळेस व्याही म्ह्णून ते एकमेकांच्या समोर आले होते. जुने प्रेमी पुन्हा समोर आल्यावर त्यांच्यातील बोलणे वाढून पुन्हा त्यांचे प्रेम जिवंत झाले आणि परिणामी मुलांच्या लग्नसमारंभाच्या अगदी दोन आठवड्यांच्या आधीच त्यांनी एकमेकांसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे आईवडिलच पळून गेल्याने दोन्ही कुटुंबांनी मिळून हे लग्न देखील मोडून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समजतेय.

टाइम्सच्या वृत्तानुसार, सुरत मधील कातरगाम परिसरात राहत्या घरून नवऱ्या मुलाचे 48 वर्षीय बाबा आणि नवसारी या परिसरातून नवऱ्या मुलीची 46 वर्षीय आई मागील दहा दिवसांपासून बेपत्ता होते, संबंधित कुटुंबांनी पोलिसांमध्ये या दोघांच्याहरवण्याची तक्र्रा नोंदवली होती, पोलिसांनी तपासात या दोघांच्या काही जुन्या मित्रांची चौकशी केली असता, "मुलाचे बाबा आणि मुलीची आई हे फार आधीपासून एकमेकांना ओळखत होते, इतकेच नव्हे तर एकेकाळी त्यांच्यात प्रेमसंबंध देखील होते, त्यामुळे जर का हे दोघे गायब झाले आहेत तर नक्कीच त्यांचे संबध पुन्हा जुळून आल्याची शक्यता मित्रांनी व्यक्त केली आहे. (मुलीच्या लग्नानंतर जावयाच्या 22 वर्षाच्या भावावर आईचा जडला जीव; लग्नगाठ बांधून झाली लेकीची थोरली जाऊ)

दरम्यान, या प्रकरणामुळे ज्या दोघांचे लग्न पूर्वनियोजित होते ते मात्र कुटुंबांनी तोडून टाकले आहे. अलीकडेच असा काहीसा अजब प्रेमाचा प्रकार लंडन मधून देखील समोर आला होता. या किस्स्यात मात्र, लॉरेन वॉल (Lauren Wall) नावाच्या एका महिलेने आपल्या आईला स्वतःच्या हनीमूनवर सोबत नेले असता तिच्या आईचे आणि नवऱ्याचे प्रेम जडले आणि हनिमून संपवून घरी परत आल्यावर नवऱ्याने चक्क महिलेला घटस्फोट देऊन तिच्या आईशी म्हणजे आपल्या सासूशी लग्न केल्याचे समोर आले होते.