Snake Head in Airline Meal (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल सोशल मीडियावरून विविध प्रकारचे व्हिडिओ समोर येत असतात. यातील काही इतके विचित्र असतात जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की, तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एका तुर्की एअरलाईन कंपनीच्या फ्लाइट अटेंडंटला विमानातील जेवणात कापलेल्या सापाचे डोके (Snake Head) सापडले. द इंडिपेंडंटनुसार ही घटना 21 जुलै रोजी तुर्कीमधील अंकाराहून जर्मनीतील डसेलडॉर्फला जाणाऱ्या सनएक्सप्रेस फ्लाइटमध्ये (SunExpress Flight) घडली.

या एअरलाइन्स कंपनीच्या एअर होस्टेसने तिच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. Sancak नावाची कंपनी सनएक्सप्रेस फ्लाइटमध्ये अन्न पुरवठा करते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एअरलाईनवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. Sancak कंपनीचे म्हणणे आहे की, ती गेल्या चार वर्षांपासून एअरलाइनसाठी केटरिंग सेवा देत आहे. अशा प्रकारची तक्रार प्रथमच प्राप्त झाली आहे. कंपनीने अन्नाचे नमुने मागितल्याचा दावा केला आहे.

केटरिंग कंपनीने आपल्या सुविधा केंद्रात सापाचे डोके सापडल्याचे नाकारले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते 280 डिग्री सेल्सिअस तापमानात अन्न शिजवतात. व्हिडीओ आणि छायाचित्रे पाहता इतक्या तापमानात सापाचे डोके शिजले असेल असे वाटत नाही. हे सापाचे डोके अन्न शिजवल्यानंतर ठेवण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. बातम्यांनुसार, विमानातील एका क्रू मेंबरला त्याच्या फूड पॅकेटमध्ये सापाचे डोके आढळून आल्याने तो अक्षरशः किंचाळला. (हेही वाचा: Viral Video: लग्नाच्या वरातीमध्ये DJ च्या गाण्यांमुळे घोडा झाला बेभान; 12 वऱ्हाडी जखमी)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, विमानात जिथे क्रू मेंबर्स जेवण घेतात तिथे काही खाद्यपदार्थांची पाकिटे ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी एकामध्ये, क्रू मेंबरने सॅलडच्या पॅकेटमध्ये सापाचे डोके सापडल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, विमान कंपनीने ही घटना अमान्य केली आहे. या घटनेनंतर विमान कंपनीने अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीवर तत्काळ कारवाई करत करार स्थगित केला आहे व घटनेची चौकशी सुरु केली आहे.