अल्जेरियामध्ये, एका महिलेला तिच्या अर्ध्या वयापर्यंत लक्षातच आले नाही की, तिच्या पोटात मूल आहे. जवळजवळ 35 वर्षांनी अचानक तिच्या पोटात दुखू लागले तेव्हा तिला याबाबत समजले. या महिलेचे वाय 73 वर्षे आहे. महिलेला अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. असह्य वेदनेने किंचाळत तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी पोटदुखीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हाती मिळालेली माहिती पाहून ते चक्रावून गेले. कारण या वृद्ध महिलेच्या पोटात अनेक दशकांपासून 7 महिन्यांचा गर्भ होता. विचित्र गोष्ट म्हणजे या महिलेला याची कल्पनाही नव्हती.
द सनच्या वृत्तानुसार, या महिलेच्या आधीही अनेकदा पोटात दुखले होते परंतु त्यावेळी डॉक्टर यामागील कारण शोधू शकले नाहीत. आता हे दुखणे अधिक वाढल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता महिलेच्या पोटात सुमारे 35 वर्षांपासून सात महिन्यांचा गर्भ असल्याचे आढळून आले. वर्षानुवर्षे हा गर्भ दगडासारखा झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला 'बेबी स्टोन' असे नाव दिले आहे. त्याचे वजन 4.5 पौंड म्हणजेच 2 किलो पर्यंत होते.
डॉक्टरांनीही अशी घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले. त्यांनी या अवस्थेला लिथोपेडियन (lithopedion) नावाची स्थिती म्हटले आहे. याबाबत डॉक्टर म्हणाले, 'जेव्हा गर्भाचा विकास गर्भाशयाऐवजी पोटात होतो तेव्हा अशी स्थिती उद्भवते. गर्भामध्ये सतत रक्ताची कमतरता असल्यामुळे त्याचा विकास शक्य होत नाही. तसेच पोटातून बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे, गर्भ दगडात बदलू लागतो. (हेही वाचा: विमानात महिलेच्या गळ्यात पट्टा घालून व्यक्ती घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)
दरम्यान, 2013 मध्ये एक वृद्ध कोलंबियन महिला जेव्हा अशाच वेदनेसाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा, तिच्या पोटात 40 वर्षांपासून 'स्टोन बेबी' असल्याचे आढळले होते. 2009 मध्ये, हुआंग यिजुन (92) या चिनी महिलेच्या पोटातूनही ‘स्टोन बेबी’ काढण्यात आला होता, जो साधारण 50 वर्षांपासून तिच्या पोटात होता.