
गुजरात (Gujrat ) मध्ये कच्छ बन्नी भागात मागील काही दिवसांपूर्वी एका दुर्मिळ प्राण्याची संख्या कमी होत असल्याचे समोर येत होते, या प्राण्याची कत्तल केली जात असल्याने ही संख्या कमी होतेय असा दावा एका स्थानिक कडून प्रसारमाध्यमांशी बोलताना करण्यात आला होता. हा प्राणी म्हणजे सांडा पाल (Sanda Lizard) . साधारण पालीपेक्षा मोठी आणि घोरपडी पेक्षा लहान असणारी ही पाल मारून तिच्या शरीरातील तेल विकण्याचा धंदा या परिसरात चालू असल्याची माहिती सुद्धा या स्थानिकाने मांडली होती, पण एका प्राण्याची कत्तल करून मिळणाऱ्या या तेलाची विक्री नेमक्या कोणत्या कारणाने इतकी फेमस आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर यावर उत्तर म्हणजे सांडा पालीच्या तेलामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात आणि सेक्स पॉवर सुद्धा वाढते अशी एक मान्यता या भागात आहे. त्यामुळेच ही हत्या अगदी रेग्युलर ठरली आहे. पण खरोखरच या तेलाचा असा काही जादुई फायदा आहे का हे आता आपण पाहणार आहोत..
न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार, सांडा छिपकलीचं तेल वापरल्याने हाडांच्या समस्या दूर होतात, यौनशक्ती वाढते, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे असे तज्ज्ञांसचे म्हणणे आहे. सांडा पालीचे फॅट हे इतर प्राण्यांप्रमाणेच असते. त्यामुळे हे तेल लावल्याने काही फायदा होतो असे कधी पाहण्यात आलेले नाही असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. दुसरीकडे, हे तेल शरीराच्या ज्या भागावर लावलं आहे, तो भाग बर्न झाल्याची उदाहरणेच अधिक आहेत असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारचा दावा खरा जरी असला तरी प्राण्यांना मारून अशा प्रकारचा व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच हाडांच्या मजबुतीसाठी बाजारात अनेक आयुर्वेदिक तेल उपलब्ध असतात, सेक्स पॉवर वाढवायची झाल्यास त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक आहे. कृत्रिम रित्या केल्या जाणाऱ्या अशा प्रकारामुळे शरीराला हानी पोहचवु शकते त्यामुळे डॉक्टरही असे मार्ग अवलंबणे टाळण्याचा सल्ला देतात.