
पाकिस्तानमधील (Pakistan) वृत्तवाहिन्यांसंबंधी अनेक विचित्र गोष्टी आपण पाहिल्या असतील. देशात वृत्त देताना अनेक मजेशीर घटना घडल्या आहेत. आता असाच एक केळाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही, परंतु तो मोठ्या प्रमाणावर लोकांचे मनोरंजन करत आहे. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतनेही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी तज्ज्ञ देशातील सिंध प्रांतातील केळांची तुलना मुंबई व ढाकाच्या केळांशी करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ पाकिस्तानातील उर्दू न्यूज चॅनल ‘न्यूज वन’चा आहे. यामध्ये अल्वीना आगा नावाची अँकर एका पाहुण्याशी बोलत आहे जिथे हा तज्ज्ञ पाहुणा तिला देशातील सिंध प्रांतातील केळांची स्थिती समजावून सांगता आहे.
व्हिडिओमध्ये ही व्यक्ती सांगत आहे की, ‘इथल्या लोकांनी थोडा खर्च केला, थोडे संशोधन केले तर ते मुंबईमध्ये मिळतात तितकी मोठी केळी पिकवू शकतील. मुंबईची केळी मोठी असतात. एका खोलीत ती केळी ठेवली तर त्याचा सुगंध दरवळतो. त्याचप्रमाणे ढाका येथील केळीदेखील मोठी असतात. संशोधन करून अशी केळी पाकिस्तानातही पिकवावीत. सिंध प्रांतात अगदी बोटाच्या लांबी एवढी केळी आढळतात.’ यादरम्यान हाताने हावभाव करून ही व्यक्ती केळांची लांबीदेखील दाखवत आहे.
(हेही वाचा: Viral Video: अरे बापरे..! हा ट्रक आहे की बाईक? व्हिडिओ पाहा आणि तुम्हीच ठरवा)
दुसरीकडे या व्यक्तीचे हे वक्तव्य ऐकून अँकर अल्विना आगा आपले हसू आवरू शकत नाही. ती लाईव्ह शोमध्येच जोरजोरात हसू लागते. तसे पाहायला गेले तर ही व्यक्ती त्याच्या जागी योग्य आहे परंतु याठिकाणी अँकरच्या हसण्यामुळे त्याला दुहेरी अर्थ प्राप्त झाला. वरवर पाहायला गेले तर हा खूप साधा व्हिडिओ आहे मात्र अँकरने त्यामध्ये डबल मिनिंग शोधले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अँकरला अनप्रोफेशनल म्हटले आहे. काहींनी म्हटले आहे की ही व्यक्ती योग्यरीत्या सांगत होती परंतु अँकरने ते वेगळ्या अर्थाने घेतले.