Leukaemia सोबत झगडणार्‍या 5 वर्षाच्या चिमुकल्यासाठी रक्तदान करण्यासाठी एका दिवसात धावले 4855 रक्तदाते
5-yr-old fighting cancer (Photo Credits: Twitter)

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. अतिवापर करणं हे अत्यंत नुकसानकारक आहे पण त्याचा सकारात्मक वापर केल्यास जीवनदान मिळू शकतं अशादेखील अनेक घटना समोर आल्या आहेत.नुकताच असा एक प्रत्यय ब्रिटनमध्ये आला. एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला रक्ताची गरज असलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना चक्क 4855 रक्तदाते एकाच दिवशी रांगेत उभे राहिल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रिटन स्थित ऑस्कर सॅक्स्लबाय ली हा अवघ्या पाच वर्षांचा चिमुकला एका कर्करोगाशी झगडत आहे. त्याला महिन्यातून दोन वेळेस रक्त बदलणं अत्यावश्यक आहे. रक्ताच्या कर्करोगाशी ( Leukaemia) सामना करत असल्याने अनेकदा रक्तदात्यांच्या कमतरतेमुळे त्याचे उपचार पुढे ढकलावे लागतात. मात्र यावर उपाय म्हणून ऑस्करच्या शाळेद्वारा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर इतरांना रक्तदानासाठी पुढे यावं याकरिता खास पोस्ट लिहण्यात आली होती. ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की चक्क 4855 रक्तदाते भर पावसातही रांगेत उभे होते.

रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. ऑस्करच्या आई-वडिलांनीही रक्तदात्यांचा प्रतिसाद पाहून त्यांचे आभार मानले. Leukaemia मध्ये उपचार करताना रक्तदात्याच्या शरीरातून रक्त घेताना स्टेम सेल्स घेतल्या जातात. केमोथेरेपी दरम्यान नष्ट होणार्‍या सेल्स यामुळे बदलली जातात.