व्हिडिओ: ट्रेनमधली गंमत अंगाशी आली; पोरगी मरता मरता वाचली
मुंबईत तरुणीचा जीवघेणा स्टंट (व्हिडिओतून घेतलेल्या संपादित प्रतिमा)

'आग, हवा, पाणी और मुंबई की लोकल ट्रेन इसे खेला नही करते', याचे भान कदाचित त्या तरुणीला नसावे. वसईहून चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या दारात उभे राहून तिने स्टंट करायला सुरुवात केली. हा खेळ जीवावरही बेतू शकतो याची तिला कल्पना नसावी. खेळ खरोखरच तिच्या अंगाशी आला. ती लोकलच्या दारातून खाली पडली. धावती लोकल आणि त्या लोकलच्या दरवाजातील खांबाला लटकता तिचा जिवंत देह. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ. आम्ही सूचीत करु इच्छितो की, व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलीत करु शकते.

लोकल तिच्या वेगात धावतच होती. स्टंट करणारी तरूणी एका हाताने दरवाजातील खांब पकडून अद्यापही लटकत होती. बचावासाठी धावा करत होती. मुंबईकर मग तो कोणताही असो. मदतीसाठी सदौव तत्पर. त्याच लोकल डब्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांनी हा प्रकार पाहिला. ते त्या तरुणीच्या बचावासाठी सरसावले. त्यांनी तिला ओढून पुन्हा लोकल ट्रेनमध्ये घेतले. तरुणीचे प्राण वाचले. व्हिडिओत सर्व काही स्पष्ट दिसत आहे.

ही तरुणी नेमकी कोण आहे. कुठली आहे. ती स्टंट करत होती की, मानसिक विकलांग होती. याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही. या प्रकाराचा व्हिडिओ मात्र व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, लोकलच्या दरवाजात ही तरुणी आपल्या कानाला हेडफोन लावून उभी आहे. काही वेळात ती आपला एक हात सोडते आणि बाहेर काढते. त्याच वेळी बाजूच्या रुळावरुन समोरुन एक भरधाव वेगात लोकल ट्रेन येते. या ट्रेनच्या वाऱ्याच्या झोतामुळे तिचा खांबाला धरलेला हात सुटतो आणि ती खाली पडते. दरम्यान, लोकलही धावत असते.

अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडत असताना डब्यातील दोन पुरुष प्रवासी पुढे सरसावतात. तिला धरुन ठेवतात. आणि बाजूची जलद ट्रेन निघून जाताच त्या तरुणीला वर घेतात. रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करु नका. तो जीवघेणा प्रकार आहे, असे रेल्वेकडून नेहमीच सांगितले जाते. पण, लक्षात कोण घेतो असा प्रकार पहायला मिळतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.