पश्चिम बंगाल: विधवा आईसाठी मुलगा शोधतोय पती, हुगली जिल्ह्यातील गौरव अधिकारी याने फेसबुकवर लिहीली भावूक पोस्ट
Gaurav Adhikari With His Mother | (Photo Credits: Facebook)

पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील हुगली (Hooghly District) येथील गौरव अधिकारी (Gaurav Adhikari) नामक एका युवकाची फेसबुक (Facebook) पोस्ट सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून बातम्या आणि चर्चेचा विषय ठरली आहे. हा युवक आपल्या 45 वर्षीय विधवा आईसाठी (Widowed Mother) योग्य असा वर शोधत आहे. या युवकाने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत पोस्ट लिहून त्याने आपण आपल्या आईसाठी योग्य वर (Groom) शोधत असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलीचीही फेसबुक पोस्ट अशीच चर्चेत आली होती. ही मुलगीही आपल्या आईसाठी वर शोधत होती.

गौरव अधिकारी हा युवक आपल्या आईसोबत हुगली जिल्ह्यातील फ्रेंच कॉलनी येथे राहतो. गौरव याच्या आईचे वय 45 वर्षे इतके आहे आणि त्यांचे पती म्हणजेच गौरव याच्या वडीलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गौरवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतो. त्यामुळे आपली आई दिवसभर एकटीच घरी असते. त्यामुळे तिला प्रचंड एकटेपणा वाटतो. म्हणूनच आपण तिच्यासाठी एका चांगल्या वराच्या शोधात आहोत.

गौरव अधिकारी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर 10 नोव्हेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक चांगला वर शोधण्याचा विचार त्याने बोलून दाखवला आहे. ही पोस्ट अत्यंत वेगाने सोशल मीडियावर शेअर होत आहे. त्याच्या पोस्टखाली लाईक्स, शेअर आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. या प्रतिक्रियांमधून काही लोकांनी गौरवची खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी त्याचे जोरदार कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मदत करण्याचे अश्वासनही दिले आहे.

आपल्या आईसाठी वर संशोधन करताना गौरवची अट आहे की, तिच्यासोबत लग्नाचा विचार करणारा वर हा स्वत:च्या पायावर उभा असावा. आईला पुस्तक वाचन आणि संगित आवडते. मात्र, पुस्तके आणि संगित ही जोडीदाराची जागा घेऊ शकत नाहीत. तिचे एकटेपण दूर करण्यासाठी जोडीदाराने तिच्या प्रत्येक सुख-दु:खात सोबत असायला हवे, अशी भावनाही गौरव आपल्या पोस्टमधून व्यक्त करतो. (हेही वाचा, 50 वर्षीय आई साठी मुलगी घेतेय नवरदेवाचा शोध ; ट्विटर वर सुरु आहे वरसंशोधन, वाचा सविस्तर)

गौरव अधिकारी फेसबुक पोस्ट

गौरवने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, लोक माझी खिल्ली उडवतील परंतू, एक पूत्र या नात्याने मी माझ्या आईचे आयुष्य आनंद बनविणे हे माझे माझे कर्तव्यच आहे. आणखी काही दिवसांनी माझे लग्न होईल. मी घर आणि माझ्या नोकरी-व्यवसायात व्यग्र होईल. तेव्हा आई अधिक एकटी पडेल. तिला एकटेपणा सतावत राहीन. त्यापेक्षा ही चांगले की तिने नव्या जोडीदारासोबत नवे आयुष्य सुरु करावे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका तरुणीनेही आपल्या 50 वर्षांच्या विधवा आईसाठी वर संशोधन सुरु केले होते. तिने अट एकच ठेवली होती की, हा वर शाकाहारी असायला हवा. तिच्या या पोस्टलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर तिची पोस्ट अनेकांनी शेअर केली. तसेच, तिला या कामी शुभेच्छाही दिल्या.