आजपासून देशभर नवरात्रीला सुरूवात झाली आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी भाविकांची देवीच्या दर्शनासाठी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी पहायला मिळत आहे. सोशल मीडीया मध्ये या सणाच्या पार्श्वभूमीवर इंडिया पोस्ट कडून 'नवरात्री गिफ्ट' (Navratrai Gift) दिली जात असल्याचा खोटा मेसेज वायरल होत आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर अनेकांना त्याबाबतचा मेसेज आणि सोबत एक लिंक दिली आहे. पोस्टाच्या सर्व्हेमध्ये सहभागी व्हा आणि लिंक वर क्लिक करा असं सांगत या गिफ्ट्सचं आमिष दाखवलं जात आहे.
पोस्ट मधील लिंक वर क्लिक केल्यानंतर काही साधे प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामध्ये लिंग, वय आदी प्रश्नांची माहिती विचारली गेली आहे. त्यानंतर बक्षीसासाठी 9 पैकी एक बॉक्स सिलेक्ट करण्यास सांगितलं जात आहे. युजर्सना स्क्रिनवर इंडिया पोस्ट कडून ते बक्षीस जिंकले आहेत. असा मेसेज देखील दाखवला जात आहे.
बॉक्स ओपन केल्यानंतर युजर्सला एकतर काहीच मिळाले नाही तर दुसरीकडे आयफोन जिंकल्याचं सांगितलं जातं. बक्षीस मिळालेल्यांना एका लिंकवर क्लिक करण्यासोबत काही नियम पाळण्याचंही आवाहन केले जाते.
दरम्यान फॅक्ट चेक मध्येही समोर आलेल्या माहितीनुसार अशाप्रकारे इंडिया पोस्ट कडून कोणतीच गिफ्ट दिली जात नाहीत. पोस्टाच्या ट्वीटर अकाऊंट वर देखील या अशा स्कीम बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही लिंक एक स्कॅम आहे. पोस्टाकडून अशी कोणतीच स्कीम नाही. आमच्याकडून देखील युजर्सना अशा बनावट लिंकपासून सावध राहण्याचा आम्ही सल्ला देत अअहोत. 'नवरात्री गिफ्ट्स'ला भुलून जाऊन कोणतीही खाजगी माहिती अनोळख्या लिंक सोबत शेअर करणं टाळण्यातच हित आहे.