Fake News (Photo Credits: File Image)

सध्या देशात निवडणुकीचा (Election) हंगाम सुरु आहे. देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. अशात निवडणुकीसंदर्भात अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक संदेश व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला आहे की, लोकसभा निवडणुकीत जे लोक मतदान करणार नाहीत अशा मतदारांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोग 350 रुपये कट करेल. सध्या सोशल मिडियावर या संदेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. आता माहिती मिळत आहे की, हा संदेश पूर्णपणे खोटा आहे व त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

निवडणूक आयोगाने 350 रुपयांबाबत असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे हा मेसेज पुढे पाठवू नका, पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने हा खोटा संदेश ट्विट केला आहे. या संदेशामध्ये म्हटले आहे की, ‘यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदान न करणे महागात पडू शकते. अशा लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, जे लोक मतदान करणार नाही अशा लोकांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यातून 350 रुपये कट केले जातील.’

यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, ‘मतदारांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करतो मात्र जे लोक मतदानासाठी येत नाही त्यांच्यावर केलेला खर्च वाया जातो. निवडणूक आयोगाने यापूर्वीच न्यायालयाची मंजुरी घेतली आहे, त्यामुळे या निर्णयाबाबत याचिका दाखल केली जाऊ शकत नाही. तसेच ज्या कुणाच्या बँक खात्यात पैसे नसतील, त्यांच्या मोबाईल रिचार्जमधून हे पैसे कट होतील.’ (हेही वाचा: Fact Check: पीएम योजनेंतर्गत आधार कार्डवरून कर्ज मिळत असल्याचा खोटा संदेश व्हायरल; जाणून घ्या यामागील सत्य)

या दाव्याची पीआयबीने पडताळणी केली व त्यामध्ये हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे. पीआयबी म्हटले आहे की, हा दावा खोटा आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे अशा भ्रामक बातम्या शेअर करू नका. दरम्यान, बनावट बातम्यांसाठी सरकारने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ही माहिती संस्था स्थापन केली आहे. पीआयबी फॅक्ट चेक युनिट बनावट माहितीचे खंडन करते आणि योग्य माहिती समोर आणते.