प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही सध्याच्या सरकारची खूप मोठी योजना आहे. ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांना या योजनेद्वारे कर्ज दिले जाते. तर तुम्हीही या योजनेअंतर्गत कर्ज घेणार असाल तर सावध रहा, कारण या योजनेच्या नावाखाली काही लोक फसवणुकीचा धंदाही करत आहेत. या संदर्भातील एक बनावट लेटर व्हायरल होत असून, त्याबाबत पीआयबीने सर्वांना सावध केले आहे. अशा खोट्या मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका असा सल्ला त्यांनी दिला आहे.
पीएम मुद्रा योजनेचा हवाला देणारे पत्र सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, ‘2015 मध्ये सुरू झालेल्या पीएम मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्यात आले आहे. यावर्षी 2021 साठी कर्ज अर्ज घेतले जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला या योजनेअंतर्गत स्वस्त व्याजावर कर्ज हवे असल्यास तुम्ही अर्ज करू शकता.’
या अर्जासोबत बँक खाते क्रमांकही देण्यात आला असून, त्यात इंटरनेट बँकिंग शुल्काच्या नावाने 1999 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र तुम्ही हे 1999 रुपये या खात्यात जमा केले तर तुम्हाला ना कर्ज मिळणार आहे आणि ना तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत. कारण हा संदेश खोटा असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असे सरकारी माहिती एजन्सी पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: Fact Check: लोकांना पाठवले जात आहे रेल्वेमधील नोकरीचे बनावट ऑफर लेटर; जाणून घ्या काय आहे सत्य)
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत असे कोणतेही पत्र जारी केलेले नाही. केंद्र सरकारच्या नावाखाली होत असलेल्या अशा फसवणुकीपासून सावध रहा.’