Fake News| Photo Credits: Twitter/PIB Fact Check

भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत असतानाच आता तिसरी लाट देखील अटळ असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून वैयक्तिक पातळीवर देखील लोकं कोरोनापासून बचाव करत असल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये अनेक नैसर्गिक, घरगुती उपाय केले जात आहेत. पण त्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीवरच अवलंबून राहणं सुरक्षित आहे. कारण सध्या काही मंडळींकडून, स्वयंघोषित योगाचार्यांकडून काही नैसर्गिक उपायांनी कोरोनापासून (Coronavirus) तुमचा बचाव होऊ शकतो असे सांगितले जाते. त्यापैकीच एक म्हणजे तुरटीचं पाणी (Alum Water) तुमच्या घशाला लागलं असेल तर तेथे कोरोना प्रवेश करू शकत नाही असा दावा करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. पण या दाव्याला वैज्ञानिक आधार नसल्याचं PIB ने स्पष्ट केले आहे.

PIB Fact Check वरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुरटीच्या पाण्यामुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो किंवा कोरोनावर मात करता येते याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लागण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार करावेत असे देखील सांगण्यात आले आहे. भारतामध्ये सध्या दिवसागणिक वाढणारे कोरोनारूग्ण चिंतेत भर टाकणारे आहेत. Fact Check: नाकात लिंबूचा रस घातल्यावर 5 सेकंदामध्ये बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य.

PIB Fact Check

भारतामध्ये काल जगातील उच्चांकी 4.12 लाखापेक्षा अधिक रूग्ण 24 तासांत आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे तर आरोग्य प्रशासनावर देखील भार वाढला आहे. अशामध्ये कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क घालणं, हात धुत राहणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तर इतर आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांनी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारे सल्ले पहा.