Dr KK Aggarwal यांनी एकट्याने कोविड-19 लस घेतल्याने नाखुश पत्नीने फोनवरच घेतला समाचार;  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पद्मश्री विजेत्या डॉक्टरांनी दिले 'हे' स्पष्टीकरण
Dr KK Aggarwal (Photo Credits: Video Screengrab/ @shukla_tarun/ Twitter)

नवरा-बायकोचे नाते सुखकर होण्यासाठी त्यांच्यामधील होणारा संवाद सुरळीत असणे गरजेचे आहे. नात्यात विसंवाद असल्यास नातेसंबंधात काही समस्या उद्भवू शकतात. पद्मश्री पुसस्कार विजेते डॉ. के.के. अग्रवाल यांनी कोविड-19 ची लस घेण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर काहीसा असा प्रसंग ओढावला. कोविड-19 लस घेण्यासंदर्भात त्यांनी आपल्या पत्नीला काहीच सांगितले नाही. त्यामुळे नाराज असलेल्या पत्नीचा डॉ. अग्रवाल लाईव्ह असताना फोन आला. त्यानंतर त्यांच्यातील फोन संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. दरम्यान, त्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी ट्विटरद्वारे याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, त्यांच्या पत्नीने हा व्हायरल व्हिडिओ पाहिला असून सर्वांनी लवकरात लवकर असे घ्यावी असे त्यांचे म्हणणे आहे.

डॉ. अग्रवाल लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोनवर आपल्या पत्नीला सांगत होते की, त्यांनी कोविड-19 लस घेतली असून त्यांच्या पत्नीनेही सोमवारी लस घ्यावी. तुम्ही मला तुमच्यासोबत का नेले नाही? तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. असे प्रश्न त्यांची पत्नी त्यांना वारंवार विचारत होती. यावर डॉक्टर म्हणाले की, लस कुठे मिळते हे पाहण्यासाठी ते गेले होते. परंतु, केंद्रावर गर्दी नसल्याने आरोग्यसेवकांनी लस घेण्यास सांगितले आणि त्यांनी होकार दिला.

दरम्यान, फोनवरच डॉक्टरांनी आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला आणि हे देखील सांगितले की ते सोशल मीडियावर लाईव्ह आहेत. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली की, मी पण लाईव्ह येऊन तुमची एैशी की तैशी करते.

पहा व्हिडिओ:

हा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी या व्हिडिओचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अग्रवाल यांनी आपल्या होणाऱ्या व्हायरल व्हिडिओबद्दल माहिती असल्याचे ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आणि आपल्या प्रकृतीची काळजी असल्यामुळे आपल्या पत्नीच्या वागण्याची पाठराखण केली. तसंच सर्वांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावर या व्हिडिओ आणि स्टेटमेंटनंतर नेटकरी डॉक्टरांचे कौतुक करत आहेत. दरम्यान, भारतात 23 लाख जणांना कोविड-19 लस देण्यात आली असून लवकरात लवकर हा आकडा वाढवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत.