Couple Gets Married in Heavy Rain: मुसळधार पावसात व्हिडिओ कॉलवर जोडपे अडकले लग्नाच्या बेडीत
Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Desi Jugaad: पावसाने महाराष्ट्रात ओढ दिली असली तरी उत्तर भारतात मात्र वरुणराजा मुसळधार (Heavy Rain) बरसतो आहे. अनेक राज्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना महापूर आला आहे. रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. शहरांमध्ये अनेक रस्ते आणि इमारती गुडघाभर पाण्यात बुडाल्या आहेत. असे असाताना भारतीय हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील दोन कुटुंबांनी अनेक अडथळ्यांवर मात करत आपल्या मुलांचे लग्न लावण्यासाठी (Marriage In Rain) एक अनोखा मार्ग शोधला. (Video Call Marriage)

आशिष सिंगा या तरुणाचे कुल्लूच्या भंतर येथील शिवाणी ठाकूर हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता. त्यासाठी आशिष सिंगा सिमलायेथील कोटगड येथून वऱ्हाड घेऊन जाणार होता. मात्र, मुसळधार पाऊस यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पाहता वधु-वराच्या कुटुंबीयांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी थेट विवाह सोहळ्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सींगचा पर्याय निवडला. या जोडप्याचा विवाह सोमवारी होणार होता. मात्र, प्रशासनाने त्यांचा विवाह निश्चित केलेल्या ठिकाणी हाय अलर्ट दिला होता. परिणामी जोडप्याने ऑनलाईन विवाह करण्याचा निर्णय घेतला, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, Wife Birthday Wishes In Marathi: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अर्धांगिनीसाठी बॅनर, स्टेटस अन हटके मेसेज; एका क्लिकवर)

हिमाचल प्रदेशात शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अचानक पूर आणि भूस्खलन होऊन घरांचे नुकसान झाले. राज्यात 24 जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातात 88 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाले आहेत आणि 16 अजूनही बेपत्ता आहेत.