कुत्र्याच्या पाठीवर हायड्रोजन फुगे बांधून त्याला हवेत सोडल्याची घटना दिल्ली येथे नुकतीच उघडकीस आली. हे कृत्य करणाऱ्या एका विकृत युट्युबरला दिल्ली पोलिसांनी अटकही केली. याहून एक भयावह कृत्य (Perverted Act) पुणे (Pune) येथील सांगवी परिसरात घडले आहे. सांगवी (Sangvi) येथे एका अज्ञात विकृताने शस्त्राच्या सहाय्याने कुत्र्याचे डोळे (Dogs Eyes) फोडले आहेत. डोळे फुटल्याने आंधळा झालेला हा जीव असाहय वेदनेने तळमळत पडला होता. ना कोणाविरुद्ध तक्रार होती. ना वेदना कोणाला सांगता येत होती. प्राणी मित्र अक्षय साहेबराव म्हसे यांना या श्वानाबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या श्वानाबाबत प्राणीमित्र संघटनांना माहिती दिली आणि पलिसांत तक्रारही केली.
प्राणीमित्रांनी या जखमी अवस्थेत असलेल्या या कुत्र्याला उपचारांसाठी प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितले की, या श्वानाचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. हा आता पाहूच शकणार नाही. दरम्यान, अक्षय साहेबराव म्हसे यांना सांगवी परिसरातील पवारनगर भागात एका कुत्र्यासोबत अनुचीत प्रकार घडला असून, त्याचे डोळे फोडण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर म्हसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय म्हसे हे सांगवी परिसरात प्राणीमित्र म्हणून ओळखले जाता. सांगवी येथील परिसरात ते कुत्र्यांना अन्न घालत असतात. प्राप्त माहितीनुसार, कुत्र्याला प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परंतू, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. (हेही वाचा, Dog Rape: भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करणारा 'बाबुराव' पोलिसांच्या ताब्यात)
कुत्र्यासारखा पाळीव, मोकाट प्राणि असो की इतर रानटी वन्यजीव. त्याच्यासोबत मानवी क्रौर्याच्या घटना काही कमी नाहीत. काही दिवसांपूर्वीच भटकताना रस्ता चुकून एक गवा पुणे शहरात आला होता. या गव्याला पाहण्यासाठी बघ्यांनी इतकी गर्दी केली की गवा बिथरला आणि सैरावैरा धावू लागला. अखेर अनेक ठिकाणी धडकल्याने गंभीर जखमी झालेला गवा अंतर्गत रक्तस्त्राव होऊ गव्याचा मृत्यू झाला होता.