Yuvraj Sambhajiraje vs Prada | Facebook@YuvrajSambhajiraje

इटालियन लक्झरी फॅशन हाऊस Prada कडून Spring/Summer 2026 menswear collection मध्ये 'कोल्हापुरी चप्पल' प्रमाणे चप्पल दाखवण्यात आली. दरम्यान इटली मध्ये झालेल्या शो मध्ये त्या चप्पलेला T-strapped, flat and intricately braided असं दाखवण्यात आलं पण त्यामध्ये भारताचा किंवा कोल्हापूरचा उल्लेख टाळला होता. यावरून नेटकर्‍यांनी संताप व्यक्त केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीही यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया देत हा सांस्कृतिक अपहार (cultural appropriation)असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरामध्ये बनवल्या जाणार्‍या खास कोल्हापुरी चपला या 12 व्या शतकापासून चालत आलेल्या कामगिरीचा नमूना आहे. या कोल्हापूरी चप्पलेला केंद्र सरकारने 2019 साली GI टॅग दिलेला आहे. त्यामुळे असं असूनही परदेशी कंपन्यांकडून त्याची नक्कल होत असल्याने अनेकांनी राग व्यक्त केला आहे.

संभाजी छत्रपती यांची भूमिका

Prada कडून झालेली ' ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही, ही कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे. PRADA कंपनी कडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाही. कंपनीने आपली चूक वेळीच सुधारून कोल्हापुरीची अस्सल ओळख न लपविता कोल्हापुरी चप्पल बाजारात आणले तर आम्ही स्वागतच करू. शेकडो - हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीची, कलाकृतींची अशी नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना योग्य वळण लावण्यासाठी भारत सरकारनेही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक म्हणून आपणही याविरुद्ध आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच त्यांची चूक सुधारविण्यास भाग पाडले पाहिजे. ' असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल खासदार धनंजय महाडिक यांनी देखील एका शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनीही आपण याबद्दल केंद्र सरकारशी बोलणार असल्याची माहिती दिली आहे.

कोल्हापूरात बनवलेली ही चामड्याची चप्पल डिझाईन आणि कारागिरी वरून 1 ते 4 हजार रूपयांपर्यंत विकली जाते पण प्राडा च्या या कोल्हापुरी वर बेतलेल्या चप्पलेची किंमत 1 लाखापेक्षा अधिक आहे.