![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/12/64-132.jpg?width=380&height=214)
गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील (Pune) गर्दी वाढत आहे. शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मेट्रो मार्गांचे विस्तार, नवीन रस्त्यांची बांधणी आणि रिंग रोडच्या प्रकल्पांचा समावेश आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन, कात्रज ते हिंजवडी या नवीन मेट्रो मार्गाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. आता पुणेकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब आहे. पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज असा भुयारी मार्ग (Yerawada-Katraj Twin Tunnel) बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीत दिले
हा भुयारी मार्ग 'ट्विन टनेल' प्रकारचा असावा, त्याच्या बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि या संदर्भातील प्रस्ताव त्वरित सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. पुण्यासह, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची बैठक काल झाली.
या बैठकीमध्ये प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करिता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे-सातारा आणि पुणे-नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटी तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नवीन शहर नियोजन करताना रस्ते 18 मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही'; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची आश्वासनपर ग्वाही)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी, पुण्यातील मेट्रो नेटवर्कच्या विस्तारासाठी काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले होते. मोहोळ यांनी खराडी ते पुणे विमानतळ, तसेच कात्रज ते हिंजवडी या नवीन मेट्रो मार्गांची शिफारस केली आहे. याशिवाय, खराडीत एक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब स्थापन करण्याचाही त्यांचा प्रस्ताव आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल, असे अपेक्षा आहे.