महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण सुधारणा, तसेच कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जुलै 2024 मध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र काही अहवाल समोर आले होते, ज्यामध्ये ही योजना बंद पडणार असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु आता लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या 20 महिलांना रसिकाश्रय या संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडविली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय, असे सांगितले.
या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, सन्माननिधी म्हणून मिळणारे 10 हजार रुपये दरवर्षी मिळावेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या मागणीचा जरुर विचार करू, असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना म्हणजे 'तिजोरीवर भार, बळीराजाला कार'; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दाखवला आरसा)
'लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही'-
"लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच "ही योजना कधीही बंद पडणार नाही!" अशी ग्वाही मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी घाटंजी (जि.यवतमाळ) येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांच्या भेटीप्रसंगी दिली pic.twitter.com/woHvUmXkmm
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)