ठाण्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकाही Axis Bank मधून कर्मचाऱ्यांची खाती वर्ग करणार? जाणून घ्या काय म्हणाल्या महापौर
Axis Bank आणि किशोरी पेडणेकर (संग्रहित संपादित प्रतिमा)

ठाणे महानगरपालिकेतील (TMC) सर्व कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेत (Axis Bank) खाती आहेत. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता याच पावलावर पावले टाकत मुंबई महानगरपालिकाही (BMC) असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ही माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना दिली. याबाबत अजूनतरी ठोस निर्णय घेण्यात आला नाही, मात्र लवकरच यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टिकास्त्रे सोडायला सुरुवात केली, त्याच पावलावर मिसेस माजी मुख्यमंत्रीही चालू लागल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि ठाकरे सरकार यांच्यामधील ट्वीटर युद्ध सर्वानीच पहिले. मात्र याचा फटका आता अॅक्सिस बँकेला (Axis Bank) बसणार आहे. ठाणे महानगरपालिकेनंतर आता मुंबई महानगरपालिकाही आपल्या कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याबाबत विचार करत आहे.

याबाबत माहिती देताना महापौर पेडणेकर म्हणाल्या, ‘आमचे गटनेते आणि सर्व नेत्यांशी चर्चा केल्यावर हा निर्णय घेतला जाईल. त्याचसोबत मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत बोलायला हवे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.’ (हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला ठाणे महानगरपालिकेचा दणका; Axis Bank मधील खाती सरकारी बँकेमध्ये वळवण्याचा निर्णय)

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अॅक्सिस बँक 40 लाखांचा विमा देते. त्यामुळे अशा प्रकारचा विमा इतर कोणती राष्ट्रीयकृत बँक देते हे तपासावे लागणार आहे. त्यानंतर पालिकेतील नेत्यांसोबत बैठक झाल्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.