बरेच चर्वितचर्वण झाल्यावर अखेर भाजप-शिवसेना युती (Shiv Sena-BJP alliance) झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis), भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांमधून तसे जाहीरही झाले. परंतू, पुन्हा जुळलेल्या युतीच्या या रेशीमधाग्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच त्यात मिठाचा खडा पडला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात मुख्यमंत्री कोणाचा यावरुन जाहीर कलगीतुरा रंगला. या कलगीतुऱ्यानंतर युती झाली तरी, ती टिकणे आणि पचायला कठीण असल्याचा संदेश दोन्ही पक्षांमध्ये गेला. या दोन मंत्र्यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेल्या संभ्रमावर प्रसारमाध्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच थेट प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण देत या दोन्ही नेत्यांच्या वादावर तीव्र नापसंती व्यक्त केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोणी काही म्हटलं, युतीबाबत काहीही वक्तव्य केलं तरी ते अधिकृत समजू नये. मी (देवेंद्र फडणवीस) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतबाबत जे सांगू केवळ तेवढेच अधिकृत समजावे आणि तेच अधिकृत असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. युतीबाबतच्या आमच्या भूमिकेच्या विसंगत जर कोणी विधाने केली तर ती युतीबाबतची अधिकृत भूमिका समजू नये, असे स्पष्ट केले. फडणवीस यांनी आपल्या विधानातून चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम या दोघांनाही अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. (हेही वाचा, 'तर युती तोडू' भाजप-शिवसेना युतीला निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच हादरा)
काय आहे वाद?
भाजप-शिवसेनेच्या युतीची घोषणा दोन्ही पक्षांतील प्रमुख नेतृत्वांच्या संयुक्त पत्रकार परीषदेत झाली. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या पक्षाचा एक आमदार जास्त निवडून येईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे विधान केले होते. त्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकरे यांना दिल्याचे विधान करत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे खंडण करत पलटवार केला होता. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे युतीने निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीच वाद निर्मण होऊन कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.