Raju Shetty (Photo Credits: Twitter/ ANI)

दूध दरवाढीसाठी या आठवड्यात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty's) यांनी बारामती येथी कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या मोर्चासाठीची परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु, तरीदेखील राजू शेट्टी यांनी जमावबंदी नियमांचे उल्लंघन करत मोर्चा काढला. या प्रकरणी राजू शेट्टी आणि मोर्चाला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी या कारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे की, 'मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता?' असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच 'उध्दवा अजब तुझे सरकार!' असा टोलाही लगावला आहे. (हेही वाचा - मराठी विरुद्ध कन्नड भाषिक वाद टाळा; एकनाथ शिंदे यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्राद्वारे विनंती)

राजू शेट्टी यांनी ट्विट केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओदेखील जोडला आहे. या व्हिडिओमध्ये राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा 15 रुपये कमी दराने शेतकरी दूध विकत आहे. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं पोलिसांना वाटलं नाही. परंतु , परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन 'आम्ही आंदोलन करणार,' असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.