Eknath Shinde (Photo Credit: Twitter)

Marathi Vs Kannada Language Disputes: मराठी विरुद्ध कन्नड वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. बेळगाव जवळील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणावर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा (Karnataka CM Yediyurappa) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी येडीयुरप्पा यांना मराठी आणि कन्नड भाषिक वाद टाळावा, अशी विनंती केली आहे.

या पत्रात एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचं दैवत आहेत. मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिक असा वाद निर्माण होऊ देऊ नका. यापूर्वीचं मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे हा वाद टाळा. तसेच पिरणवाडी-मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा, अशी मागणीदेखील एकनाथ शिंदे यांनी या पत्रात केली आहे. (हेही वाचा - बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...,रोहित पवार यांचे आशिष शेलारांना प्रत्युत्तर)

दरम्यान, बेळगावमधील पिरणवाडी या गावात शिवाजी महाराज आणि संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यावरून वाद सुरू आहे. पिरणवाडी या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या चौकाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या चौकात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न काही कन्नड भाषिक संघटना करत होत्या. परंतु, यास तेथील मराठी भाषिक संघटनांनी विरोध दर्शवला. मात्र, या चौकात मध्यरात्री संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यात आला.

दुसऱ्या दिवशी ही घटना लक्षात आल्यानंतर मराठी भाषिक आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन पुकारले. यावेळी पोलिसांनी मराठी भाषिक आंदोलकांवर लाठीमार केला. सध्या बेळगावमध्ये मराठी आणि कन्नड भाषिकांमधील वाध अधिकचं वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्र पाठवत मराठी आणि कन्नड भाषिक वाद टाळण्याची विनंती केली आहे.