Weekend Lockdown: महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यामागचे नेमके कारण काय? बाळासाहेब थोरात यांनी दिली अशी माहिती
Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लावला जाणार असून दर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माहिती दिली आहे. विकेंडला मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असतात. याशिवाय, अन्य कार्यक्रमदेखील याच दिवशी पार पडत असतात. याचा परिणाम कोरोना संसर्ग वाढवण्यावर होत असतो. ज्यामुळे राज्यात आठवड्यातील शेवटचे दोन दिवस लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध केले जावेत, अशी चर्चा राज्यमंडळाच्या बैठकीत झाली होती, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येने 50 हजार टप्पा गाठला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले होते. याचपार्श्वभूमी उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीतच सलग लॉकडाऊनऐवजी वीकेंड लॉकडाऊनचा पर्याय पुढे आला. यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. हे निर्बंध उद्यापासून लागू केले जाणार असून आजच त्याबाबत गाइडलाइन्स जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Maharashtra COVID-19 Restrictions: महाराष्ट्रामध्ये Weekend Lockdown ची घोषणा; रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत लागू असेल नाईट कर्फ्य

याशिवाय, करोना नियंत्रणात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स जारी केल्या जाणार आहेत. राज्यात उद्यापासून केवळ अत्यावश्यक सेवांसोबत लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मॉल, दुकाने, सिनेमागृह, नाट्यगृह, ब्युटी पार्लर, केशकर्तनालये, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे.