Maharashtra Weather Forecast: राज्यात निवळलेला थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील हवेचा जोर कमी झाल्याने महाराष्ट्रातील थंड वातावरण काहीसे निवळले होते. मात्र, उत्तरेकडील हवेमध्ये सातत्या नाही. त्यातील जोर कमी-अधिक होत आहे. परिणामी महाराष्ट्रातील वातावरणावर त्याचा परिणाम होऊन गारठा वाढला आहे. हे वातावरण असेच राहिले तर राज्यात थंडीची अधिक वाढू शकते. खास करुन सोमवारनंतर (5 फेब्रुवारी) राज्यामध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. (India Meteorological Department)
तापमान घटण्याची शक्यता
राज्यातील वातावरण तसे कोरडे राहील. असे असले तरी कोरड्या वातावरणातही थंडी अनुभवायला मिळेल. खास करुन पहाटे आणि सकाळी दवबिंदू पाहायला मिळतील. काही प्रमाणात धुकेही आढळून येण्याची शक्यता आहे. या सर्व घडामडींमध्ये वातावरण साधारण चार ते पाच सेल्सियस अंशाने घटण्याची शक्यता आहे. सध्या वाऱ्याची स्थिती प्रभावी चक्रीय आहे. जी नैऋत्य राजस्थान आणि त्यालगतच्या पाकिस्तानवर पाहायला मिळते. या वातावरणाचा राज्यातील हवामानावर परिणाम होऊ शकतो. राज्यात सरासरी तापमानाची नोंद पुणे येथे 12.6 अंश सेल्सिअस इतकी झाली. (हेही वाचा, Skin Care Tips For Winter: हिवाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी; 'या' खास टीप्सचा वापर करून मिळवा कोरड्या त्वचेवर परफेक्ट सोलूशन)
डोंगराळ भागात हिमवर्षाव
महाराष्ट्रात अशी स्थिती असताना दुसऱ्या बाजूला उत्तर भारतातील डोंगराळ भागात हिम आणि बर्फ पडताना पाहायला मिळत आहे. खास करुन जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्ताराखंड. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होत असल्याने अनेक रस्ते, मार्ग बंद करण्यात आले आहेत. राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरणीय बदल पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सकाळी पाऊस पडला. आता दिल्लीमध्ये संबध दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढच्या 24 तासांसाठी भारतीय हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजात शक्यता वर्तविण्यात आली आहे की, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्ताराखंड, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल, सिक्कीम आदी ठिकाणी तापमान साधारण 6-10 डिग्री सेल्सियस इतके राहू शकते. सहाजिकच महाराष्ट्रावरही या वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळेल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, दक्षिण कोकण आण गोवा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे पाच दिवस हवामान कोरडे राहील. सध्यातरी या हवामानात कोणताही बदल संभवत नाही. हवामानाचा हा अंदाज शनिवार म्हणजेच 3 फेब्रुवारी ते बुधवार (7 फेब्रुवारी) असा पुढचे पाच दिवसांसाठी असणार आहे.