
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच पाहिजे यात काहीही शंका नाही. परंतु, ओबीसी समाजाच्या (OBC Reservation) आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर, रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिला आहे. नुकतीच भाजपाच्या ओबीसी कार्यकरिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचे कलम टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. हे देखीला वाचा- आदित्य ठाकरे, रोहित पवार टीशर्ट, जीन्स घालून मंत्रालयात उनाडक्या करतात; सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड नियमावरुन निलेश राणे यांची टीका
भाजप महाराष्ट्राचे ट्वीट-
भाजपा ओबीसी मोर्चा कार्यकारणीला मार्गदर्शन करताना श्री देवेंद्र फडणवीस व श्री चंद्रकांतदादा पाटील https://t.co/kifZfezSbo
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 13, 2020
ओबीसींच्या विकासावर राज्याचा विकास अवलंबून आहे. यामुळे ओबीसी समाजाचा विकास झालाच पाहिजे. येत्या काळात 346 ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे. भाजपमध्ये ओबीसींचे मोठे योगदान आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटले जायचे. तसेच ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपचे ध्येय असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.