कल्याण-डोंबिवलीतील (Kalyan-Dombivali) लोकांना आज पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मोहिली आणि बारावे या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी ही पाणीकपात करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत ही या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागात दर मंगळवारी थोड्याफार प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. तशी माहिती महापालिकेकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून दिलीही जाते. त्याचप्रमाणे आज 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
जलशुद्धीकरणाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यावर रात्री 8 नंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती महापालिका विभागाने दिली आहे.
हेदेखील वाचा- कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूक 2020: शिवसेनेला धक्का, भाजपचे विकास म्हात्रे विजयी
मोहिली जलशुद्धीकरण आणि मोहिली उदंचन केंद्र त्याचबरोबर बारावे जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व यांत्रिकी उपकरणाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे, अशी माहिती कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेनं दिली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेनं केले आहे.
असेच मागे डिसेंबर महिन्यात काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर पाणीकपात करण्यात आली होती. पालिकेच्या पिसे उदंचन केंद्रामध्ये ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.