Anand Nagar | (Photo Credits-ANI Twitter)

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) हद्दीत असलेल्या आनंद नगर (Anand Nagar) परिसरात पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने प्रशासनाने आनंद नगर परिसर कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषीत केला आहे. दरम्यान, परिसरातील नागरिक काल (8 जून) लॉकडाऊन (Lockdown) नियमांचा भंग करत मोठ्या प्रमाणावर एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली.

दगडफेक करणाऱ्या नागरिकांमध्ये काही नागरिकांचा “महापालिका प्रशासनाकडून आमच्या जेवणाची व्यवस्था होत नाही. लॉकडाऊनमुळे त्यांना आवश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत नाही” असा आरोप होता. प्रामुख्याने दगडफेक करणाऱ्या जमावात महिलाही मोठ्या प्रमाणावर होत्या. दरम्यान, दगडफेकीची घटना आणि मोठा जमाव बेकायदेशीररित्या एकत्र आल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

आनंद नगर परिसर हा पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अत्यंत दाटीवाटीचा आणि झोपडपट्टी बहुल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 250 पार गेला आहे. त्यामुळे हा परिसर 13 मे पासून सील करण्यात आला आहे. अद्यापही हा भाग कंटेनमेंट झोन म्हणूनच कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील इतर भागांच्या तुलनेत या परिसरात प्रशासनाकडून नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. (हेही वाचा, Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत कोरोनाच्या नव्या 12 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1924 वर पोहचला, महापालिकेची माहिती)

ट्विट

आनंद नगर परिसरात सुमारे 2300 ते 2500 घरे असून, लोकसंख्याही सुमारे दहा हजारांहून अधिक आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी या परिसरात लॉकडाऊन आणि कंटेनमेंट झोन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांवर काही निर्बंध लागले आहेत. परिणामी हे निर्बंध शिथील करावेत आणि आमच्या परिसरातील कंटेनमेंट झोन उठवावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे. ही मागणी करत परिसरातील नागरिक एकत्र आले. तसेच त्यांनी दगडफेकही केली.