देशात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर गेले अनेक महिने मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Trains) बंद होती. दरम्यान, मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा मिळाली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्वांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्यांना लोकमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यास राज्य सरकारला यश आले आहे. यामुळे येत्या 1 जूनपासून सर्वसामन्यांना लोकलमधून प्रवास करता येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात राज्याचे पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मुंबई लोकलबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. ज्यामुळे कोरोना रुग्णांचा आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणे आवश्यक आहे. सरसकट सूट दिली तर, पुन्हा गर्दी होईल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आणखी 15 दिवस तरी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करता येणे शक्य नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- Satara: सातारा जिल्ह्यातील निर्बंध आज रात्री 12 वाजल्यापासून आणखी कडक, वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई
तसेच राज्य सरकार येत्या 1 जूनपासून काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. राज्यातील पुढील 5 ते 6 दिवसांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. रेड झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात काल (23 मे) 26 हजार 672 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 29 हजार 177 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 51 लाख 40 हजार 272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 3 लाख 48 हजार 395 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.12% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.