राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप (BJP) आक्रमक झाली असून त्यांनी ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन सुरु केले आहे. यावरुन आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना भाजपला चांगलेच प्रत्त्युतर दिले आहे. "मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. केंद्र सरकाराचा आहे. आम्ही केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत आहोत," अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. (Maharashtra BJP कडून राज्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन)
ते म्हणाले की, "केंद्राच्या पत्रानुसार मंदिरं उघडण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे. केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला तर आम्हीही घेऊ. केंद्राच्या आदेश आणि सूचनेप्रमाणे आम्ही काम करत आहोत. त्यांच्या सूचना केवळ महाराष्ट्रासाठी नाहीत तर देशासाठी आहेत." शंखनाद आंदोलन हे महाराष्ट्राच्याविरोधात नसून ते केंद्र सरकारच्या विरोधात असावं. कारण मंदिर न उघडण्याच्या सूचना केंद्र सरकारच्याच आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, दारुची दुकाने उघडली जातात मग मंदिरं का नाही? या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. कोणत्या राज्यात मंदिर उघडली गेली आहेत? तिकडे मध्यप्रदेश, युपी, हरियाणा आणि कर्नाटक येथे दारुची दुकाने बंद आहेत का? भाजपने शुद्धीत येऊन बोलावं, बेधुंद वक्तव्य करू नयेत, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी भाजपला सुनावलं आहे.
"मंदिरे उघडे करण्याचे आदेश काढा असं मोदींना सांगा. म्हणजे मंदिरं सुरू होतील आणि भाजपवर आंदोलन, दिखावा करण्याची वेळ येणार नाही, "असंही ते म्हणाले. तसंच मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाचे संकट संपवण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.