Tomato Price ( Image Credit -Pixabay)

जून महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी राज्यात मान्सून पावसाचं आगमन झालेलं नाही. रखडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील मान्सून लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईसह राज्यात बाजारात टॉमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याच्या आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाल्याची परिस्थिती धाराशिवमधील बाजार पेठेत पाहायला मिळत आहे. मे महीन्यात किरकोळ बाजारात 5 ते 10 रूपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्या 50 ते 60 रुपये किलो दराने विक्री होत आहेत.  (हेही वाचा- Weather Update: हवामान खात्याकडून जाहिर; येत्या दिवसांत 'ह्या' राज्यात उसळणार उष्णतेची तीव्र लाट)

सध्या ठोक बाजारात शेतकऱ्यांना 13 ते 30 रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 50 ते 60 दर मिळत आहे. मागील सहा महिन्यांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 5 ते 15 रुपयांवर स्थिरावले आहेत. परंतु या वर्षी जून महीन्यात टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. उकाड्यामुळे फुलगळती झाल्याने टोमॅटोच्या दरात चारपट वाढ झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात बिपरजॉय वादळाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून राज्यात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे .