Vasant More Quits MNS: मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांचा राज ठाकरे यांना राजीनामा देत 'जय महाराष्ट्र'!
Vasant More । FB

मनसेचे पुण्याचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षांतर्गत त्यांची गळचेपी होत असल्याने नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. अखेर आज त्यांनी मनसेला (Maharashtra Navnirman Sena) जय महाराष्ट्र करत आपला राजीनामा दिला आहे. सोशल मीडीयात त्यांनी केलेल्या पोस्ट नुसार, त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंना (Raj Thackeray) लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी 'अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे 'तंत्र अवलंबिले जात आहे. म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

वसंत मोरे यांचा राजीनामा

वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी ही भेट खासदार म्हणून सुप्रिया सुळेंना पत्र देण्यासाठी होती असं सांगितले होते. वसंत मोरे पुण्यामधून खासदारकी साठी इच्छूक आहेत. मनसेला रामराम केल्यानंतर पुढील प्रवासाची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

आज सकाळी देखील वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी त्यांची पोस्ट होती.

पुण्यात अ‍ॅक्टिव्ह असलेले वसंत मोरे यांनी यापूर्वी देखील आपली नाराजी व्यक्त केली तेव्हा राज ठाकरेंनी त्यांची भेट घेत ती दूर केली होती. मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेवरुन मोरे नाराज होते. करोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत गाडी फोडल्यानंतर वसंत मोरे विशेष चर्चेमध्ये आले होते.