Representational Image (Photo Credits: Pixabay)

वाढत्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत की काय अशी भीती वाटायला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसई (Vasai) येथील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता (Oxygen Shortage) असल्याचे दिसून आले होते. आता वसई शहरातील नालासोपारा परिसरातील रुग्णालयात, ऑक्सिजनअभावी 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मंगळवारी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाचे 10 रुग्ण याठिकाणी मरण पावले असल्याचे रुग्णालयातील अधिका-यांनी सांगितले आहे. अद्याप अनेक संक्रमित रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे.

मृतांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचे जीव गेले आहेत, मात्र रुग्णालयाने ही गोष्टी मान्य केली नाही. विनायक रुग्णालयातील अधिकारी सांगतात की, सर्व रुग्ण आधीच गंभीर आजाराने ग्रस्त होते आणि म्हणूनच त्यांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी ऑक्सिजनची कमतरता नाही. वसईत कोरोनाचे 7000 हून अधिक सक्रीय रुग्ण आहेत, त्यापैकी किमान 3000 रूग्णांची स्थिती चिंताजनक असून त्यांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता आहे.

नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर म्हणाले की, ‘रुग्णांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था सुरळीत असाव्यात यासाठी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या घटनेकडे लक्ष वेधू इच्छितो. मी मदतीसाठी आवाहन केले आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘वसई तालुक्यात ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. विशेषतः, पुरवठा केवळ तीन तास टिकतो. दुर्दैवाने, आमच्या प्रदेशात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी तीन रुग्णांचा आधीच मृत्यू झाला आहे. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना या गंभीर प्रकरणात लक्ष देण्याची विनंती करतो. तालुक्यात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करा.’ याप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हस्तक्षेप करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित! मुंबई पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत)

त्यानंतर, भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, कोरोना रुग्णांच्या मृत्यूबद्दल सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, मात्र ते सध्या फक्त लॉकडाउनवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांना असे वाटत नाही की, राज्याला ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, उपाययोजना यांची आवश्यकता आहे.’