Coronavirus (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  प्रसार वाऱ्याच्या वेगाने होत असताना त्यासोबतच अनेक अफवा सुद्धा आजकाल सर्वत्र पसरताना पाहायला मिळत आहे, कधी हे खाल्ल्याने कोरोना बरा होतो तर कधी या गादीवर झोपल्याने कोरोनावर उपचार होतो असे खोटे दावे करणारे काही प्रकार मागील काही काळात उघड झाले होते, या सर्व व्यक्तींवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती मात्र अजूनही हे सत्र कायमच आहे. आज तर, वसई  (Vasai) आणि नालासोपारा (Nalasopara)  मधील दोन डॉक्टर सुद्धा अशाच प्रकारे अफवा पसरवत असल्याचे समोर आले. प्राप्त माहितीनुसार, वसई आणि नालासोपारा येथील दोन डॉक्टरांनी आपापल्या क्लिनिकच्या बाहेर येथे कोरोनावर उपचार करणार असे फलक लावले होते, कोरोनावरील कोणतीही अधिकृत लस अद्याप सापडली नसताना असा दावा करणे हे केवळ व्यवसायाच्या दृष्टीने केले असल्याचे स्पष्ट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरांचे हे खाजगी क्लिनिक आहे, ज्याबाहेर त्यांनी कोरोनावर उपचार करणार असल्याचे फलक लावले होते. याप्रकरणी सध्या सविस्तर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 'Anti- Coronavirus गादीवर झोपून कोरोना पळवा' भिवंडी येथे खोट्या जाहिरातीचा प्रसार केल्याप्रकरणी एका कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

ANI ट्विट

दरम्यान, कोरोनाच्या बाबत कोणत्याही प्रकारची खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकार कडून देण्यात आले आहेत. याआधी सुद्धा बीड, पुणे, नाशिक, भिवंडी येथे अशा प्रकारची खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. सद्य घडीला महाराष्ट्रात कोरोनाचे 47 रुग्ण आहेत, नुकत्याच उल्हासनगर आणि मुंबई मधून २ कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचण्या झाल्याचे समोर आले होते.