COVID-19 Vaccine: पुण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची चाचणी; भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये 6 स्वयंसेवकांना आज दिला जाणार पहिला डोस
Coronavirus Vaccine प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Flickr)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनावरील लस बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून पुण्यात (Pune) ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची (COVID-19 Vaccine) चाचणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 3 महिला आणि 3 पुरुषांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे आरटी- पीसीआर आणि अँटीबॉडी चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल अनुकूल आले तर, लसीचा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये सहा स्वयंसेवकांना आज या लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. " 6 जणांवर आम्ही चाचणी करणार आहोत. त्यांची तपासणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांची RT-PCR आणि अँटीबॉडी चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट अनुकूल आले तर, लसीचा डोस दिला जाईल" असे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय संचालक संजय लालवानी यांनी इंडियन एक्प्रेसला सांगितले आहे. हे देखील वाचा-Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात 10,425 रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता संपूर्ण जगात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात कोरोनाचे आतापर्यंत 2 कोटी 40 लाख 65 हजार 872 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 8 लाख 23 हजार 569 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 कोटी 66 लाख 14 हजार 271 जणांनी कोरोनावर मात केली आहे.